दरवर्षी राज्यात १५ हजार कृषी पदवीधर कृषी विद्यापीठातून बाहेर पडतात. त्यापकी बहुतेक विद्यार्थी हे स्पर्धा परीक्षांच्या तयारीला लागतात. काही खासगी क्षेत्रात नोकऱ्या करतात, तर काही कृषी सेवा केंद्र किंवा अन्य व्यापार उद्योगात उतरतात. नाइलाजाने काहींना शेती करावी लागते. लाखोंच्या संख्येने कृषी पदवीधर असूनही शेतकऱ्यांना मात्र मार्गदर्शन करणारे थोडेच असतात. त्यामुळे कृषी साक्षरतेत आजही राज्य मागे आहे. असे असले तरी कर्तव्यभावनेतून सोशल मीडियाचा प्रभावीरीत्या वापर करून काही विद्यार्थी हे काम करीत आहेत. ‘अन्नदाता सुखी भव:’ हे ब्रीदवाक्य घेऊन ‘होय आम्ही शेतकरी’ या नावाने फेसबुक पेज व व्हॉटस्अ‍ॅप ग्रुप त्यांनी बनविला आहे. वेगवेगळ्या कृषी विद्यापीठांमध्ये पीएच.डी करणारे पाच कृषिविशारद व प्रगतशील शेतकऱ्यांनी हे काम नि:स्वार्थी वृत्ती ठेवून व्यस्त दैनंदिनीतून वेळ काढून विनामूल्य चालविले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पूर्वी शेती ही नापासांची शाळा होती. शेतकऱ्याचा मुलगा नापास झाला की, त्याला शेतीत काम करावे लागे. नापासाच्या गुणपत्रिकेबरोबर शेतकरी ही पदवी त्याला आपोआप चिकटली जाई, पण पुढे चित्र बदलले. शिक्षणाच्या प्रसारामुळे कला, वाणिज्य, शास्त्र शाखेतील पदवी घेतल्यानंतरही नोकरी नसल्याने अनेकांना शेती करावी लागली. अभियांत्रिकी, वैद्यकीय शिक्षण घेतलेलेही शेती करत आहेत. आता शेती ही पासांची शाळा बनली आहे. मात्र कृषी शिक्षण घेतलेल्यांची संख्या अत्यल्प अशीच आहे. जे आहेत ते स्वत:ची शेती करताना स्वत:साठीच घेतलेले ज्ञान मिळवितात. त्यामुळे आता शेतीत गावोगाव सल्लागारांचे पीक वाढले आहे. कन्सल्टंट ही जमात आता शेती क्षेत्रातही कार्यरत झाली आहे. विशेष म्हणजे कृषी शिक्षण न घेता मर्यादित ज्ञानाच्या आधारे ते हा व्यवसाय करतात. हे सल्लागार आता डािळब, द्राक्ष, कांदा, ऊस व भाजीपाल्याच्या टोमॅटो, काकडी, वांगे या पिकांकरिता एकरी ५०० रुपयांपासून ५ हजार रुपयांपर्यंत वर्षांला पसे कमवितात. अनेक जण काही कंपन्यांचे छुपे दलालही असतात. कृषी सेवा केंद्र, नर्सरी, कंपन्या यांच्या लागेबांधे ठेवून ते आपले उखळ पांढरे करीत असतात. काही मंत्रतंत्र, काही निसर्ग, काही मीठ, काही सेंद्रिय अशा वेगवेगळ्या शेतीचा प्रचार-प्रसार करतात. त्यात शेतकरी गोंधळून गेला आहे. कोणत्या मार्गाने जायचे हे त्याला सांगणारे अनेक आहेत. मात्र त्यात आधुनिक शेतीचे धडे देणारे फारच कमी आहेत. त्यामुळेच ‘होय आम्ही शेतकरी’ या सोशल मीडियावरील टीमने कृषी साक्षरतेचे हे काम गुणवत्ता व शिस्त टिकवून चालविले आहे. शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये म्हणूनही ते दक्ष असतात.

राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठातील कीटकशास्त्र विषयात पीएच.डी. करणारे अंकुश चोरमुले (रा. आष्टा, सांगली) हे गावात गेले की, लोक त्यांच्याकडे कृषी सल्ला घ्यायला येत. आता शेतकऱ्याकडे अ‍ॅण्ड्रॉइड मोबाइल आहेत. अनेक शेतकऱ्यांची मुले ही फेसबुक व्हॉटस्अ‍ॅप वापरतात. त्यामुळे त्यांनी सोशल मीडियाचा वापर शेतीसल्ल्याकरिता करण्याचा निर्णय घेतला. १२ जून २०१५ या रोजी चोरमुले यांच्यासह आष्टा येथीलच शेतकरी अमोल राजन पाटील, गुजरातच्या जुनागड कृषी विद्यापीठातील विनायक भाऊसाहेब िशदे,डॉ. कुणाल सूर्यवंशी, डॉ. ओमप्रकाश हिरे, विश्वजित कोकरे, राजू गाडेकर व गणेश सहाणे हे कृषी पदवीधर, शेतकरी प्रकाश खोत हे ९ जण एकत्र आले. त्यांनी तयार केलेल्या फेसबुक पेजला २५ हजार शेतकऱ्यांनी भेटी दिल्या, तर ८ हजारांहून अधिक युजर्स आहेत. फेसबुक पेजच्या माध्यमातून त्यांनी सर्व पिकांची तंत्रशुद्ध माहिती, पिकांवर पडणाऱ्या किडी व रोगांवर उपाययोजना, हवामानाचा अंदाज, शेतमालाचा चालू भाव व शेतीशी निगडित व्यवसाय याची माहिती दिली. त्यानंतर शेतकऱ्यांकडून त्यांना व्हॉटसअ‍ॅपवर ग्रुप करण्याची मागणी होऊ लागली.

डॉ. नरेश शेजवळ यांचे कृषिकिंग हे अ‍ॅप आहे. या अ‍ॅपवर शेतमालाच्या भावाचे विश्लेषण केले जाते. त्यांच्या मुख्य अ‍ॅपच्या माध्यमातून त्यांनी अ‍ॅप इन अ‍ॅप या पद्धतीने ‘होय आम्ही शेतकरी’ हे अ‍ॅप तयार केले. आता त्यांचे २० व्हॉटस्अ‍ॅप ग्रुप असून सुमारे ५ हजार शेतकरी या ग्रुपचे सदस्य आहेत. या ग्रुपवर तज्ज्ञ समस्यांवर उपाय सुचवितात, शेतीची शास्त्रशुद्ध माहिती देतात, शेतकऱ्यांशी चर्चा करतात. सर्वानी काम वाटून घेतले आहे. शेतकऱ्यांचे नवीन प्रयोग व यशोगाथा टाकल्या जातात. तसेच विनामूल्य मार्गदर्शन करतात.  जेथे शेतकऱ्यांची फसवणूक केली जाईल त्याबाबत त्यांना सावध केले जाते. सोशल मीडियाच्या माध्यमातून सरकारी नोकरी, शेती करणाऱ्याबरोबरच कृषीचे उच्चशिक्षण घेणाऱ्यांचा बळीराजा सुखी व्हावा म्हणून सारा खटाटोप आहे.

ashok tupe@expressindia.com

मराठीतील सर्व लोकशिवार बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Effective use of social media for farming
First published on: 07-07-2016 at 05:43 IST