राज्य व केंद्र सरकारच्या विविध योजनांमध्ये बाबुर्डी ग्रामपंचायतीत सुमारे एक कोटी रूपयांचा भ्रष्टाचार झाल्याचे उघड झाले आहे. याबाबत गटविकास अधिकारी किरण महाजन यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच ग्रामीण पाणीपुरवठा उपविभागाच्या उपअभियंत्यांना या गैरव्यवहाराची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
या ग्रामपंयातीस भारत निर्माण योजनेसाठी ३७ लाख ३२ हजार ६६५ रूपये निधी आला होता. हे काम पूर्ण झालेच नाही, तरीही खात्यातील ३७ लाख १० हजार ४६७ रूपये काढून घेण्यात आले आहेत. या योजनेतून झालेला पाणीपुरवठा माळवाडी व बाबुर्डी गावठाणात थोडय़ाफार प्रमाणात होतो. इतर वाडय़ावस्त्यांवर या योजनेचे कामच झालेले नाही. ही योजना अपूर्ण असतानाच पैसे मात्र काढून घेण्यात आले आहेत. या ग्रामपंचायातीचा नव्याने पदभार घेतलेल्या ग्रामसेवकास मागील कोणत्याही योजनांची अंदाजपत्रके किंवा कागदपत्रे कार्यालयात उपलब्ध झालेली नाहीत.
जनसुविधा व राजीव गांधी भवन योजनेसाठी या ग्रामपंचायतीस सन २०११ ते २०१४ या कालावधीमध्ये २४ लाख ४८ हजार ९५० रूपयांचा निधी मिळाला होता. या खात्यावर केवळ २१ हजार रूपये शिल्लक आहेत. इंदिरा आवास योजनेमार्फत मंजूर झालेल्या ११ घरकुलांपैकी ३ घरकुले विनापरवाना वन खात्याच्या जागेमध्ये उभारली आहेत. घरकुल बांधण्यात आले असे भासविण्यासाठी रोकडीया देवस्थानची खोली दाखविण्यात आली आहे. लाभार्थी चंद्रकांत कुलकर्णी, सरपंच रमेश गवळी तसेच ग्रामसेवक पटेकर यांनी संगनमताने या योजनेचे पैसे काढून घेतले असून संबंधीत अधिकारीही त्यास जबाबदार असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. तेरावा वित्त आयोग, मागास क्षेत्र विकास अनुदान निधी, सर्वसाधारण ग्रामनिधीतही गैरव्यवहार झाल्याचे सांगण्यात येते.