अभियांत्रिकी अभ्यासक्रमाची क्रेझ अजूनही पूर्णपणे कमी झालेली नसली, तरी त्यामागील वास्तव बरेचदा नजरेआड केले जाते. नागपूर विद्यापीठात पाच वर्षांपूर्वी या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांपैकी १० हजार विद्यार्थी अंतिम वर्षांला पोहोचण्यापूर्वी गळाले आहेत.
नागपूर विद्यापीठाच्या अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या आठव्या सत्राचा निकाल नुकताच जाहीर झाला. अंतिम सत्राच्या परीक्षेला बसलेल्या चार हजार विद्यार्थ्यांपैकी ९० टक्के विद्यार्थी परीक्षा उत्तीर्ण झाले. निकालाची आकडेवारी नक्कीच चांगली आहे. परंतु, त्याचे मूळ शोधायला गेले तर भयाण परिस्थिती आहे. २००९-१० या सत्रात विद्यापीठाशी संलग्न ३४ महाविद्यालयांमध्ये १४ हजार विद्यार्थ्यांनी पहिल्या सत्राला प्रवेश घेतला होता. ही बाब लक्षात घेतली तर अभ्यासक्रम पूर्ण होण्यापूर्वी तब्बल १० हजार विद्यार्थी बाजूला पडले आहेत.
अभियांत्रिकीच्या आठव्या सत्राच्या परीक्षेला बसलेल्या चार हजार ३६६ विद्यार्थ्यांपैकी तीन हजार ९६६ उत्तीर्ण झाले. यांपैकी २६७४ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, तर ४६५ द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले. यात पुनर्परीक्षार्थी (रिपीटर) विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. अभियांत्रिकी अभ्यासक्रमाची महाविद्यालये आणि त्यातील जागा वाढल्या असतानाही विद्यार्थ्यांची संख्या कमी होत असल्याबद्दल ही विद्याशाखा चिंतेत आहे. गेल्या काही वर्षांमध्ये एकही नवे महाविद्यालय सुरू झाले नसले, तरी जागांची संख्या या वर्षी २५ हजारांवर गेली. याउलट, केवळ १५ हजार विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी अर्ज केले. याचाच अर्थ, नागपूर विद्यापीठात १० हजारांहून अधिक जागा रिकाम्या राहणार आहेत.
राज्य स्तरावरही ही स्थिती तेवढीच चिंताजनक आहे. तंत्रशिक्षण संचालनालयाच्या आकडेवारीनुसार, अभियांत्रिकीच्या १ लाख ५५ हजार जागा उपलब्ध असताना ९३ हजार विद्यार्थ्यांना पहिल्या फेरीत प्रवेश देण्यात आला. याचा अर्थ, दुसऱ्या फेरीसाठी ६२ हजार जागा रिकाम्याच राहिल्या. आणखी दोन हजार विद्यार्थी आयआयटी, एनआयटी आणि इतर राज्यांतील प्रख्यात महाविद्यालयांना प्राधान्य देतील, असा अधिकाऱ्यांचा अंदाज असून, तसे झाल्यास दुसऱ्या फेरीसाठी उपलब्ध जागांची संख्या वाढून ६४ हजार होईल.
अभियांत्रिकीच्या दर्जात झालेली घसरण, हा या अभ्यासक्रमासाठी प्रवेशाचे निकष शिथिल करण्याचा परिणाम असल्याचे या विद्याशाखेशी संबंधित शिक्षणतज्ज्ञांचे मत आहे. आता बारावीत ४०-४५ टक्के गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांनाही अभियांत्रिकीत प्रवेश मिळतो. पूर्वी हा निकष ५० टक्के गुणांचा होता, याचा त्यांनी उल्लेख केला. तंत्रशिक्षण संचालनालय घेत असलेल्या अभियांत्रिकी प्रवेश परीक्षेत २०० पैकी १ गुण मिळवणारा विद्यार्थीही महाविद्यालयात प्रवेश मिळवू शकतो, यावरून अभियांत्रिकी शिक्षणाच्या घसरत्या दर्जाचा अंदाज करता येऊ शकतो. अशा परीक्षेचा उपयोग काय, असा प्रश्न त्यांनी विचारला.
बारावीत गणित हा अनिवार्य विषय असण्याची अटही तंत्रशिक्षण संचालनालयाने या वर्षी शिथिल केली आहे. अशा विद्यार्थ्यांकडून तुम्ही काय अपेक्षा करू शकता? यापेक्षा असे विद्यार्थी गळावेत आणि ज्या विद्यार्थ्यांचे तार्किक ज्ञान आणि मूलभूत संकल्पना पक्क्या आहेत, असेच विद्यार्थी अंतिम वर्षांत पोहोचणे योग्य आहे, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले. तुमच्याकडे रिक्त राहिलेल्या अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या जागांची माहिती पाठवावी, असे निर्देश गेल्या वर्षी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्यातील सर्व विद्यापीठांना दिले होते. या आकडेवारीचे शासनाने काय केले, हे अजूनही कळले नाही, असेही शिक्षणतज्ज्ञांनी सांगितले.