करोनाच्या गंभीर रुग्णांवरील उपचारासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सातारा जिल्हा रुग्णालयाला मदत म्हणून दिलेली १७५ रेमडेसिवीर इंजेक्शन्स गायब असल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

सातारा जिल्ह्य़ात करोनाबाधितांची आणि अत्यवस्थ रुग्णांची संख्या वाढू लागल्याने पवार यांनी सातारा दौऱ्यादरम्यान १७५ रेमडेसिवीर इंजेक्शन्स जिल्हा रुग्णालयाकडे सुपूर्द केली होती. या वेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे हेही उपस्थित होते. परंतु, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांनी या इंजेक्शन्सच्या वापराबाबत तपशिलाची विचारणा केली असता, ती गायब झाल्याचे उघडकीस आले. राष्ट्रवादीच्या पदाधिकारी शिष्टमंडळाने याबाबतचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले. या इंजेक्शन्सचा कोणत्या रुग्णांसाठी वापर केला, त्याचा तपशील द्यावा आणि इंजेक्शन्स चोरीला गेली असल्यास चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी त्यात करण्यात आली आहे.

‘गहाळ झाल्याची शक्यता’

राष्ट्रवादीच्या निवेदनासंदर्भात जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी इंजेक्शन्स गहाळ झाली असल्याची शक्यता व्यक्त केली. याप्रकरणी आपण जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याशी बोललो आहोत. सत्यता पडताळणीसाठी चौकशी समितीही नेमणार असून, कोणालाही पाठीशी घातले जाणार नसल्याचे सांगताना ही इंजेक्शन्स चोरून इतरत्र विकली गेल्याची शक्यता मात्र डॉ. चव्हाण यांनी फेटाळून लावली .