पिंपरी-चिंचवडमध्ये लपाछपी खेळणं एका पाच वर्षाच्या मुलाच्या जीवावर बेतलं आहे. खेळताना त्याचा पाण्याच्या टाकीत पडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना निगडी परिसरात मंगळवारी सायंकाळी घडली. अथर्व पाटील (वय-५) असं पाण्यात बुडून मृत्यूमुखी पडलेल्या मुलाचं नाव आहे. घराबाहेर तो खेळत असताना अचानक दिसेनासा झाला, त्यावेळी घरच्यांनी आणि पोलिसांनी शोध घेतला असता तो पाण्याच्या टाकीत आढळला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,अथर्व नितीन पाटील (वय-५ रा.नवले वस्ती,चिखली) हा मंगळवारी राहत्या घरातून सायकल घेऊन बाहेर खेळायला गेला, तेव्हा त्याची आई घराबाहेर बसली होती. बराच वेळ झाला तरी अथर्व घरी न आल्याने त्याचा परिसरात शोध  घेण्यास सुरूवात झाली. पण तो सापडत नसल्याने शेवटी निगडी पोलिसांना याची माहिती सायंकाळी सात वाजता देण्यात आली. पोलीस देखील तातडीने दाखल झाले आणि अथर्वचा पुन्हा शोध सुरू झाला, पण अथर्व काही सापडत नव्हता. अखेर घरापासून काही अंतरावर बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या समोरील पाण्याच्या टाकीत रात्री दहा वाजता त्याची चप्पल तरंगताना दिसली. यावरून पोलिसांना संशय आला, पाण्याच्या टाकीत उतरल्यानंतर अथर्व सापडला,त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

मित्रांसोबत लपाछपी खेळताना लपण्यास गेला तेव्हा तो टाकीत पडला असावा असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.अधिक तपास निगडी पोलीस करत आहेत.या घटनेमुळे पुन्हा एकदा पालकांनी मुलावर लक्ष ठेवलं पाहिजे हे अधोरखीत झालं आहे. काही दिवसांवर उन्हाळ्याच्या सुट्ट्या आल्या आहेत. मुलं कुठे खेळतात, ते कोणासोबत जातात,  यावर पालकांनी लक्ष द्यायला हवं त्यामुळे असे अपघात टाळता येतील.