दुबईतून आल्याने लागण झाली

रत्नागिरी :  दुबई येथून आल्यानंतर करोना रोगाचा संशयित म्हणून जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या एका व्यक्तीला करोना रोगाची लागण झाली आहे.

गुहागर तालुक्यातील श्रृंगारतळी येथील ही सुमारे पन्नास वर्षे वयाची व्यक्ती काही दिवसांपूर्वी येथील जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल झाली होती. तिच्या खोकला व घशातील  द्रावाची चाचणी सकारात्मक आल्यामुळे करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रयोगशाळेच्या अहवालाने यावर शिक्कामोर्तब झाले  असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक बोल्डे यांनी सांगितले.

दरम्यान जिल्ह्यातील या पहिल्या रूग्णामुळे आरोग्य आणि प्रशासकीय यंत्रणा आणखी  सतर्क  झाली असून रात्री उशिरा जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी आपत्कालीन बैठक घेतली.  शहर व जिल्ह्यात आवश्यक  उपायोजना तात्काळ करून नागरिक सार्वजनिक ठिकाणी मोठय़ा संख्येने येणार नाहीत, याचा जास्तीत जास्त प्रयत्न करण्याचे आदेश सर्व शासकीय यंत्रणांना देण्यात आले आहेत.

करोना व्हायरसचे जिल्हा शासकीय रुग्णालयात एकूण सात संशयित रुग्ण दाखल झाले होते. त्यामध्ये हातीव (ता. राजापूर), गणपतीपुळे व जयगड येथील पाच जणांचा समावेश आहे. पुणे ठाणे येथून जाऊ न आल्याने त्यांना करोनासारखी लक्षणे जाणवू लागल्याने हे पाचही स्वत:हून जिल्हा रुग्णालयात दाखल झाले आहेत. त्यांना सर्दी-खोकल्याचा त्रास असल्याने ते खबरदारी म्हणून दाखल झाले आहेत. परिस्थिती पाहून त्यांच्या थुंकीचे व घशातील द्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्याचा अहवाल नकारात्मक आला होता.

मंगळवारी आणखी दोन कोरोना संशयित रुग्ण दाखल झाले आहेत. एक कुवारबाव येथील आहे. तो पंजाबहून प्रवास करून आला आहे. तर श्रंगारतळी (गुहागर) येथील एकजण दुबईहुन आला होता. त्याच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु असताना त्याचा अहवाल बुधवारी रात्री जिल्हा रुग्णालयाला प्राप्त झाला. तो सकारात्मक असल्याचे निष्पन्न झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली असून यंत्रणा सतर्क झाली आहे.