वाडय़ात संचारबंदीचे तीनतेरा; योजनेतील एक हजार रुपयांसाठी ३० किलोमीटरची पायपीट

रमेश पाटील, लोकसत्ता

वाडा: करोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. लोकांची गर्दी थोपविण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. मात्र ग्रामीण भागातील  नागरिकांकडून प्रतिसाद मिळत नसल्याचा प्रत्यय वाडा शहरात येत आहे. येथील विविध बँकांच्या दारात ग्राहकांची तुफान गर्दी होत आहे. या गर्दीमुळे वाडय़ात संचारबंदीचे तीनतेरा वाजले आहेत.

केंद्र व राज्य सरकारकडून निराधार व वयोवृद्धांना संजय गांधी, इंदिरा गांधी, श्रावण बाळ अशा विविध योजनांतर्गत दरमहा एक हजार रुपये दिले जातात. हे पैसे लाभार्थ्यांचे बचत खाते ज्या बँकेत आहे त्या ठिकाणी जमा होत असतात. तालुक्यात विशेषत: ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत येथील बहुतांशी लाभार्थ्यांची खाती असल्याने तालुक्यात या बँकेच्या शाखा असलेल्या वाडा, खानिवली, कुडूस व कंचाड या शाखांसमोर लाभार्थ्यांची गेल्या चार दिवसांपासून मोठय़ा प्रमाणात गर्दी दिसून येत आहे.

वाडा शहरातील ठाणे जिल्हा बँकेसमोर बुधवारी निराधार योजनेतील पैसे काढण्यासाठी पाचशेहून अधिक वयोवृद्ध लाभार्थ्यांनी गर्दी केली होती. सामाजिक दुरीकरण न ठेवता ही गर्दी झाल्याने करोना विषाणू प्रतिबंधक उपाययोजनेचे तीनतेरा वाजल्याचे दिसून आले आहे.

या निराधार योजेनेतील लाभार्थ्यांच्या गर्दीमध्ये किसान सन्मान योजना तसेच बँकेचे अन्य व्यवहार करणाऱ्या खातेदारांचीही भर पडल्याने संचारबंदीमध्येही येथे माणसांचा मोठा बाजार भरलेला दिसून येत होता. वाडा शहरातील स्टेट बँक, महाराष्ट्र बँक या ठिकाणीही तुरळक गर्दी दिसून येत होती. मात्र जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या समोरील गर्दीने करोनाच्या टाळेबंदीला हरताळच फासला गेला होता.

टाळेबंदीमुळे  ग्रामीण भागात जाणारी एसटी बस व अन्य प्रकारची खासगी वाहतूक बंद असल्याने  निराधार योजनेचे पैसे काढण्यासाठी अनेक वयोवृद्ध लाभार्थी खेडय़ापाडय़ांतून १० ते १५ किलोमीटर अंतर पायी चालत आले होते. एक हजार रुपयांचे मानधन घेण्यासाठी काही लाभार्थ्यांनी तर २५ ते ३० किलोमीटरची पायपीट केल्याचे अनेक लाभार्थ्यांनी सांगितले.

दिस उगवण्याआधी (दिवस उगविण्यापूर्वी) मी घरला चालत निघालाव, तवा आता बँकेत पहोचलाव, आख्खा दिस जाल तवा माझा नंबर लागलं.

– सायकी भुऱ्या वाघ, वयोवृद्ध लाभार्थी महिला, परळी, ता. वाडा

(वाडय़ापासून परळी हे गाव १७ किलोमीटर अंतरावर आहे.)

केंद्र व राज्य सरकारकडून विविध योजनांतर्गत लाभ मिळणाऱ्या लाभार्थ्यांची खाती गावपातळीवरील टपाल विभागाने (शाखा डाकघर) इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या माध्यमातून उघडलेली आहेत. शासनाने या टपाल खात्याच्या बँकेमार्फत लाभार्थ्यांना घरपोच लाभ मिळवून द्यावा.

– जयेश शेलार, सामाजिक कार्यकर्ता, वाडा