A restaurant in Pune has started delivering food in steel lunch boxes after plastic ban in Maharashtra: राज्यात प्लास्टिक बंदी लागू झाल्यानंतर अनेक व्यापाऱ्यांनी त्याला विरोध केला आहे. पुण्यामध्ये तर काल महानगपालिकेसमोर मिठाई व्यापाऱ्यांनी आंदोलनही केले. अनेकांना आता हॉटेलमधून घरी पार्सल नेण्यासाठी घरून डब्बे घेऊन कसे जावे असा प्रश्न पडला आहे. मात्र यावर पुण्यातील एका हॉटेलने नामी उपाय शोधून काढला आहे. या हॉटेलने चक्क टेक अवे काऊण्टवर येणारी ऑर्डर थेट स्टेनलेस स्टीलच्या डब्ब्याने ग्राहकांपर्यंत पोहचवण्याची इको फ्रेण्डली सोय उपलब्ध करुन दिली आहे.

पुण्यातील हॉटेल व्यवसायिक गणेश शेट्टी यांची काही हॉटेल्स आहेत. त्यांनीच ही अभिनव संकल्पना सुरु केली आहे. एकीकडे महाराष्ट्र शासनाने लागू केलेल्या प्लास्टिक बंदीला हॉटेल असोसिएशन आणि हॉटेल मालक विरोध करत असतानाच शेट्टी यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. ग्राहकांनी डिलिव्हरी मिळाल्यानंतर हे डब्बे हॉटेलला परत करण्याची सोयही उपलब्ध करुन दिली आहे. होम डिलिव्हरीसाठी जाणारा हॉटेलचा वेटरच हे डब्बे परत घेऊन येतो. तर हॉटेलमधून टेक अवे म्हणजेच पार्सल घरी न्यायचे असेल तर एकूण बिलाबरोबरच २०० रुपयांची नामत रक्कम ग्राहकांना हॉटेलकडे जमा करुन डब्बा घरी घेऊन जात येईल. हा डब्बा परत केल्यानंतर संपूर्ण रक्कम ग्राहकांना परत केली जाईल अशी ही योजना हॉटेल मालक आणि ग्राहक दोघांना फायद्याची ठरणार आहे.

२३ मार्च रोजी महाराष्ट्र शासनाने प्लास्टिकच्या पिशव्या, चमचे, प्लेट्स, बाटल्या आणि थर्माकॉल यांच्या निर्मितीवर, वापरावर आणि विक्रिवर बंदी घाण्याचा आध्यादेश काढला. याची अंमलबजावणी या शनिवारपासून म्हणजेच २३ जूनपासून सुरु झाली आहे. त्यामुळे अनेक हॉटेल मालकांबरोबर ग्राहकांनाही आता हॉटेलमधील पदार्थ घरी न्यायचे कसे असा प्रश्न पडला आहे. यावर उपाय म्हणून आम्ही ही स्टीलच्या डब्ब्याची सोय उपलब्ध करुन दिल्याचे गणेश शेट्टींनी एनएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले. निर्सग संवर्धानाच्या दृष्टीने महत्वाचा असणाऱ्या महाराष्ट्र सरकारच्या प्लास्टिक बंदीच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करत आहोत. मात्र अनेक हॉटेल मालकांना या निर्णयाचा मोठा फटका बसला आहे. सरकारने हॉटेल व्यवसायिकांना पर्यायी व्यवस्था उभी कऱण्यासाठी वेळ द्यायला हवा होता असे मत शेट्टी यांनी व्यक्त केले. पर्यायी व्यवस्था नसल्याने झोमॅटो, स्वीगी यासारख्या फूड अॅप्सने घरपोच डिलिव्हरी देण्याची सोय बंद केली आहे. ग्राहकांनाही या निर्णयाचा फटका बसला असल्याचे शेट्टींने सांगितले.

आता शेट्टी यांनी वापरलेला हा फंडा इतर हॉटेल व्यवसायिक वापरतील का हे येणारा काळच सांगेल. पण अशाप्रकारे स्टेनसेल स्टीलच्या डब्ब्यांचा वापर वाढल्यास नक्कीच प्लास्टिकच्या डब्ब्यांना चांगला पर्याय उपलब्ध झालाय असं म्हणता येईल.