राज्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये कृषी मालाच्या विक्री मूल्यावर शेतकऱ्यांकडून वसूल केली जाणारी आडत बंद करण्याच्या निर्णयाला सोमवारी राज्य सरकारकडून तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. पुढील पंधरा दिवसांसाठी आडत बंदीला स्थगिती देण्यात आल्याची माहिती राज्याचे सहकार मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली.
आडत बंदीच्या निर्णयाला जोपर्यंत स्थगिती मिळत नाही,  तोपर्यंत २२ डिसेंबरपासून कोणत्याही शेतमालाच्या लिलावात सहभागी न होण्याचा इशारा व्यापारी संघटनांनी दिला होता. त्यामुळे व्यापारी संपाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नरमाईची भूमिका घेऊन आडत बंदीला तात्पुरती स्थगिती दिली आहे. तर, व्यापाऱयांच्या दबावापोटी चांगल्या निर्णयाला स्थगिती दिल्याची प्रतिक्रिया शेतकऱयांकडून व्यक्त होत आहे. याबाबत बोलताना, कोणताही पर्यायी मार्ग अस्तित्त्वात आणल्याशिवाय आडत्याची पद्धत बंद करणे योग्य नसल्याचे त्यांनी सांगितले. यासंदर्भात लवकरच निर्णय घेण्याचा प्रयत्न राज्य सरकार करत असले तरी,  एखाद दुसऱया बैठकीत यावर तोडगा निघणे शक्य नसल्याचेही त्यांनी सांगितले.