सांगली : निर्बंध झुगारून व्यवसाय सुरू केल्याप्रकरणी महापालिकेने सहा आस्थापनांवर कारवाई करीत बुधवारी ४६ हजाराचा दंड वसूल केला. महापालिका, महसूल आणि पोलीस यांच्या संयुक्त पथकाद्वारे ही कारवाई करण्यात आली.

जिल्ह्य़ात अत्यावश्यक सेवा सकाळी सात ते अकरा या वेळेत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. तरीही ज्या सेवांना परवानगी देण्यात आलेली नाही असे काही व्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळताच महापालिकेच्या उपायुक्त स्मृती पाटील, अप्पर तहसीलदार अर्चना पाटील आणि पोलीस अधिकारी यांच्या संयुक्त पथकाने पाहणी केली असता सहा आस्थापना सुरू असल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणी संबंधित सहा व्यावसायिकांकडून ४६ हजाराचा दंड वसूल करण्यात आला. वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक अविनाश पाटणकर  यांच्यासह सर्व स्वच्छता निरीक्षक यांनी सहभाग घेतला होता.