बोगस बियाणे आणि अवैध खत विक्रेत्यांवर कारवाई

औरंगाबाद :  खरीप हंगामाच्या पाश्र्वभूमीवर बोगस बियाणे आणि खतांमध्ये भेसळ करून विक्री करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई केली जात असल्याचा अहवाल नुकताच राज्य सरकारला देण्यात आला आहे. जालना येथे ८० लाख रुपये किमतीचे एचटीबीटी कापसाचे बियाणे जप्त करून गुन्हा दाखल करण्यात आला असून औरंगाबाद तालुक्यातील माळीवाडा येथे १ कोटी दोन लाख रुपये किमतीचे अवैध खत आणि कीटकनाशकांचा साठा जप्त करून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरवर्षी बोगस बियाणे आणि अवैध खतांचा व्यापार रोखावा यासाठी नेमलेल्या पथकाने मोठी कारवाई केल्याची आकडेवारी सरकारदरबारी सादर केली असली तरी अधिकाऱ्यांचा जोर परवाने निलंबित करण्यापर्यंतच मर्यादित राहिला आहे. परवाने रद्द करण्याऐवजी ते निलंबित करून पुन्हा त्याच दुकानदारांना परवाने देण्याची पद्धत या वर्षीही चालूच राहील, असे सांगितले जाते. २०१७-१८ मध्ये मराठवाडय़ात १४०५ परवाने निलंबित करण्यात आले. त्यापैकी ५४ जणांचा परवाना रद्द करण्यात आला आणि फक्त १६ ठिकाणी पोलीस कारवाई करण्यात आली. १२८८ दुकानांतून माल विक्री करू नये, असे आदेश बजावण्यात आले होते, तर गुणनियंत्रण पथकाने जप्त केलेल्या साठय़ाचे मूल्य ६ कोटी ८१ लाख रुपये एवढे होते, असे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सरकारला कळविले आहे. मराठवाडय़ात चांगली योजना म्हणून शेततळ्याचे काम जोमाने हाती घेण्यात आले. त्यात औरंगाबाद जिल्हा अग्रेसर आहे.

मराठवाडय़ात २२९ सामूहिक शेततळे पूर्ण करण्यात आले. त्यामुळे १ हजार १८६ हेक्टर जमीन ओलिताखाली आल्याचा दावा कृषी विभागाने केला आहे. वैजापूर आणि गंगापूर तालुक्यात शेततळ्याची योजना प्रभावीपणे राबविल्याचा दावा केला जात आहे. मात्र, खरीप हंगामापूर्वी बियाणांची आणि खतांची अवैध विक्री होऊ नये म्हणून अजूनही तपासण्या होण्याची आवश्यकता आहे.