साकळाई पाणी योजनेसाठी आमरण उपोषण करणाऱ्या अभिनेत्री आणि शिवसंग्राम पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा दिपाली सय्यद यांचं उपोषण अद्यापही सुरु आहे. अहमदनगर जिल्ह्यातील ३५ गावांच्या पाणी प्रश्नासाठी दिपाली सय्यद ९ ऑगस्टपासून उपोषणाला बसल्या आहेत. त्यांच्या या उपोषणाला कलाविश्वातून पाठिंबा मिळत असून अभिनेत्री मानसी नाईक, सीमा कदम, श्वेता परदेशी आणि सायली पराडकर यांनी पाठिंबा दिला आहे.
दिपाली सय्यद या गेल्या दीड महिन्यांपासून साकळाई पाणी योजनेसाठीचा लढा उभारत आहे. त्यांच्या या आंदोलनामध्ये त्यांना लाभधारक गावातून मोठा पाठिंबा मिळाला आहे. साकळाई योजनेतून अहमदनगर आणि श्रीगोंदा तालुक्यातील ३५ गावांच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे.
तुम्हा सर्वांच्या पाठिंब्याने आणि आशिर्वादाने आज पासून मी साकळाई पाणी योजनेसाठी आमरण उपोषणाला बसणार आहे. तुमचे प्रेम असेच पाठीशी राहू द्या..मला खात्री आहे आपण नक्की यशस्वी होऊ
.
.#deepalisayed #uposhan #ahmednagar pic.twitter.com/fcfvIGh8On
— Deepali Sayed (@deepalisayed) August 9, 2019
दरम्यान, गेल्या २० वर्षांपासून हा प्रश्न प्रलंबित असून नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही योजना मंजूर करण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र अद्यापही या आश्वासनाची पूर्तता झालेली नाही. त्यामुळे दिपाली यांनी जिल्हा परिषदेच्या प्रांगणात उपोषण सुरु केलं आहे.