रस्त्यांवर असणाऱ्या खड्ड्यांचा त्रास सर्वसामान्यांना रोजच सहन करावा लागत असतो. मात्र युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनाही नुकताच खड्ड्यांचा फटका बसला आहे. आदित्य ठाकरे नाशिक दौऱ्यावर असून यावेळी प्रवासात असताना घोटीजवळ त्यांच्या आलिशान रेंजरोव्हर गाडीचा टायर फुटल्याची माहिती मिळाली आहे. यामुळे आदित्य ठाकरेंना नाइलाजाने दुसऱ्या गाडीने हॉटेलला पोहोचावं लागलं.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई – नाशिक रस्त्यावरील घोटीजवळ पाडळी गावात रस्त्यांवर खूप मोठे खड्डे आहेत. वारंवार तक्रार करुनही प्रशासन याकडे लक्ष देत नसल्याची तक्रार आहे. येथूनच जात असताना आदित्य ठाकरे यांच्या कारचा टायर फुटला. मध्यरात्री टायर फुटल्याने त्यांच्या सोबत असणाऱ्यांची चांगलीच धावपळ झाली. अखेर आदित्य ठाकरे दुसऱ्या कारने हॉटेलवर पोहोचले.

स्थानिकांच्या तक्रारीनंतरही दुर्लक्षित केले जाणारे खड्डे किमान या घटनेनंतर तरी बुजवले जातील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

आदित्य ठाकरेंचा नियोजत कार्यक्रम –
शनिवारी सकाळी १० वाजता सिडकोत महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. नंतर ते माउली लॉन्स येथील सामाजिक कार्यक्रमास उपस्थित राहतील. मध्य नाशिक मतदारसंघात स्वसंरक्षण शिबीर, दुपारी भगूर येथे बस स्थानकाचे भूमिपूजन, तीन वाजता पांढुर्ली येथे टेलि मेडिसीनचा शुभारंभ ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे.

सायंकाळी घोटी येथे इगतपुरी-त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघ कार्यालयाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती जिल्हा संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी यांनी दिली.

आगामी निवडणुकांच्या दृष्टिकोनातून शिवसेनेने मतदारांपर्यंत पोहोचण्याची धडपड नव्याने सुरू केल्याचे दौऱ्यातील कार्यक्रमांवरून दिसत असे सांगितले जात आहे.

दरम्यान, ठाकरे यांच्या हस्ते मागील काही वर्षांत अनेक नावीन्यपूर्ण उपक्रमांचे उद्घाटन झाले आहे. मुंबईच्या धर्तीवर, शालेय विद्यार्थ्यांना टॅब वितरणाची योजना नाशिकमध्ये वाजतगाजत सुरू करण्यात आली होती. नंतर तिचे काय झाले हे सेनेतील पदाधिकाऱ्यांना ज्ञात नाही.