गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत एका ठरावधारकाचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर शनिवारी विरोधी गटाचे नेते माजी खासदार धनंजय महाडिक यांनी हा पालकमंत्र्यांच्या हट्टाचा बळी असल्याचा आरोप केला आहे. तर, पालकमंत्री सतेज पाटील यांनी सत्ताधाऱ्यांना भ्रष्टाचाराच्या मुद्द्यामुळे निवडणूक जड जाण्याची भीती असल्याने असे आरोप केले जात आहेत, असा पलटवार केला आहे.

गोकुळ निवडणूकसाठी प्रचार यंत्रणा गतिमान झाली आहे. अशातच शाहूवाडी तालुक्यातील सुभाष पाटील या ठरावधारकाचा करोनामुळे निधन झाले आहे. हा मुद्दा आता गोकुळच्या राजकीय पटलावर तीव्रपणे उमटताना दिसत आहे. यावरून धनंजय महाडिक यांनी पालकमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. ‘न्यायालयात पालकमंत्री पाटील यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील करोना रुग्ण स्थिती हाताळण्या सारखी आहे, असे प्रतिपादन केले होते. त्यानुसार निवडणूका होत आहे. परंतु एका करोनाग्रस्त ठराव धारकाचा मृत्यू हा पालकमंत्री सतेज पाटील यांच्या निवडणूक घेण्याच्या हट्टाचा बळी आहे, असा आरोप केला.

यावर पालकमंत्री पाटील यांनी गोकुळ दूध संघातील भ्रष्टाचार आणि इतर कोणत्याही मुद्द्यावर सत्ताधारी गट निवडणुकीला सामोरे जाऊ शकत नाही. त्यामुळे गोकुळची निवडणूक वारंवार पुढे जावी यासाठी सत्ताधारी गटाचा प्रयत्न सुरू आहेत. सत्ताधारी सर्वोच्च न्यायालयात गेला असून सोमवारच्या निर्णयानुसार पुढील प्रक्रिया होणार आहे. ठराव धारकाचा मृत्यू ही दुर्देवी घटना आहे, असे सांगितले.

निवडणूक यंत्रणेतील बदल –
गोकुळचे निवडणूक निर्णय अधिकारी प्रांताधिकारी वैभव नावडकर यांनी आज(शनिवार) गोकुळ निवडणुकीबाबत बदलाची माहिती दिली. गोकुळसाठी निवडणूक केंद्र अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण येथील नाट्यगृहात होणार होते ते स्थगित करण्यात आले आहे. या ऐवजी आता वाढत्या करोनाच्या पार्श्वभूमीवर तालुकास्तरावर प्रशिक्षण देण्यात येणार आहे.