छत्रपती संभाजी राजेंची भूमिका साकारून घराघरात पोहचलेले अभिनेते अमोल कोल्हे यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आमदार छगन भुजबळ, प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील, विधीमंडळ पक्षनेते अजित पवार,विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. शिवसेनेसाठी लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर एक मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे. याशिवाय औरंगाबादचे (बदनापूर) माजी आमदार अरविंद चव्हाण यांनीही भाजपाला रामराम करत राष्ट्रवादीमध्ये जाहीर प्रवेश केला.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार छगन भुजबळ यांनी अमोल कोल्हेंच्या प्रवेशामुळे नक्कीच निवडणुकीत फायदा होणार आहे असा विश्वास व्यक्त केला. अमोल कोल्हे यांनी छत्रपती शिवाजीराजे, छत्रपती संभाजी कसे होते हे मांडले आहे. ते सुशिक्षित आहेत. त्यांचा नक्कीच निवडणुकीत फायदा होणार आहे असं छगन भुजबळ यांनी म्हटलं.

यावेळी प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी बोलताना सांगितलं की, ‘आज विशेष आनंद की जगाच्या पाठीवर प्रतिभावंत कलेवर प्रेम करत राजा शिवछत्रपती साकारला आणि आता राज्यातील घराघरात गाजत असलेली स्वराज्य रक्षक संभाजींचा स्वाभिमानी इतिहास उभा करणारे डॉ. अमोल कोल्हे यांनी शिवसेनेचा त्याग करुन राष्ट्रवादीत प्रवेश केला’. अमोल कोल्हे यांचे स्वागत करताना प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी त्यांना घड्याळ चिन्ह आणि मफलर देवून पक्षात प्रवेश दिला.

बदनापूरचे माजी आमदार अरविंद चव्हाण यांनीही प्रवेश केला. भाजपमध्ये वाईट अनुभव घेतल्यावर ते स्वगृही परतले आहेत असेही प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी सांगितले. नंदुरबार भाजपाचे नेते यश पाटील, किशोर पाटील, भाजप डॉक्टर सेलचे हर्षल पवार यांनीही यावेळी राष्ट्रवादीत प्रवेश केला.

तरुणाईला योग्य दिशेची गरज याची जाणीव फक्त शरद पवारांच्या नेतृत्वामध्ये -अमोल कोल्हे
अनेकांना हा प्रश्न पडला असेल की आज देशाच्या राजकारणात फार मोठी अस्वस्थता आहे. तरुणाईला योग्य दिशेची गरज आहे. ही जाणीव शरद पवारांसारख्या नेतृत्वामध्ये आहे. त्यामुळे त्यांचे हात बळकट करावे म्हणून मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आहे.

शिवसेनेचे सुसंस्कृत नेते उद्धव ठाकरे यांच्यासोबत काम करायला मिळाले. मात्र आता आनंद होत आहे. लहानपणी शरद पवार साहेबांची छबी बघण्यासाठी त्यांच्या गाडीमागे मी धावत होतो. परंतु आज त्यांच्याच पक्षाचे काम करायला मिळत आहे. यापुढे पक्षाचे काम अखंडपणे सुरु राहणार आहे असे डॉ. अमोल कोल्हे यांनी स्पष्ट केले.

आगामी लोकसभा निवडणुकांच्या वेळी शिरूर लोकसभा मतदारसंघातून अमोल कोल्हे राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणूक लढवू शकतात अशी शक्यता आहे. अमोल कोल्हे यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली होती. बारामती येथील गोविंदबाग या शरद पवारांच्या निवासस्थानीच ही भेट झाली होती. त्यावेळी संभाजी ब्रिगेडचे नेते प्रवीण गायकवाडही त्यांच्यासोबत होते. या दोघांनीही शरद पवारांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आलं होतं. त्यावेळी ही भेट सदिच्छा भेट असल्याचं सांगण्यात आलं होतं.

छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज अशा दोन्ही भूमिका साकारून अमोल कोल्हे घराघरात पोहचले आहेत. त्यांनी 2014 मध्ये शिवसेनेत प्रवेश केला. शिवाजी महाराजांच्या विचाराचं बोट धरून चालणारा पक्ष म्हणजे शिवसेना आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी शिवसेना प्रवेशाच्या वेळी दिली होती. 2014 च्या विधानसभा निवडणुकांच्या वेळी अमोल कोल्हे हे शिवसेनेचे स्टार प्रचारक होते. अमोल कोल्हे यांच्या खास वकृत्वशैलीमुळे श्रोते त्यांचे भाषण आवर्जून ऐकत. पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगर पालिका निवडणुकांमध्ये शिवसेनेची पिछेहाट झाली. त्याची नैतिक जबाबदारीही अमोल कोल्हे यांनी स्वीकारली होती.