राज्यात सचिन वाझे प्रकरण गाजत असतानाच मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी पत्राद्वारे गृहमंत्र्यांवर केलेल्या आरोपामुळे एकच खळबळ माजली आहे. परमबीर सिंह यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांसोबतच उपमुख्यमंत्री अजित पवार, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आणि राज्यपालांचे प्रिन्सिपल सेक्रेटरी यांना परमबीर सिंह यांनी एक पत्र पाठवलं आहे. या पत्रातून त्यांनी गृहमंत्री देशमुख यांच्यावर अनेक आरोप केले आहेत.

या आरोपानंतर विरोधकांनी सरकारला आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांना धारेवर धरलं आहे. या प्रकरणात आता अमृता फडणवीस यांनी उडी घेत सरकारवर निशाणा साधलाय. अमृता फडणवीस यांनी एक ट्विट करत सरकारचा आणि गृहमंत्री अनिल देशमुख समाचार घेतला आहे.

अमृता फणवीस यांनी नाव न घेता एका ट्विट केलं आहे. “बात निकली है तो बहुत दूर तलक जाएगी, बादशाह को बचाने में कितनो की जान जाएगी ?” असं ट्विट त्यांनी केलंय. यात कुणाच्या नावाचा उल्लेख नसला तरी त्यांनी हॅशटॅगमध्ये ‘सचिन वाझे’ आणि ‘टार्गेट 100 कोटी’  असं म्हंटलंय. यावरून सरकारवर त्यांचा रोख असल्याचं लक्षात येतंय.

याआधी देखील अमृता फडणवीस यांनी सचिन वाझे प्रकरणात एक ट्विट केलं होतं. कोण कोणास म्हणाले -*व्यवहार माझे,**जबाबदार वाझे!*सांगा पाहू ….” असं ट्विट त्यांनी वाझे प्रकरणी करत सरकारवर निधाणा साधला होता.

विरोधी पक्षनेते देवेद्र फडणवीस यांनी सरकारने याप्रकरणी चौकशी करावी म्हणत गृहमंत्री अनिल देशमुखांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.फडणवीस म्हणाले,“मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परबमबीर सिंग यांनी लिहिलेलं पत्र हे केवळ खळबळजनक नाही, हे धक्कादायक अशाप्रकारचं पत्र आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात डीजी रँकच्या अधिकाऱ्याने इतक्या खुलेपणे गृहमंत्र्यांबद्दल अशाप्रकारचं पत्र लिहिण्याची ही पहिलीच वेळ आहे. या पत्रात त्यांनी एक चॅट जोडली आहे, हा थेट पुरावाच दिसतो आहे की ज्यामधून अशाप्रकरे पैशांची मागणी झाली आहे. त्यामुळे एकुणच हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे. ” असं फडणवीस म्हणाले आहेत.

गृहमंत्र्यांनी अटकेतील वादग्रस्त पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना महिन्याला १०० कोटींचे हप्ते वसूल करण्याचे लक्ष्य दिले होते, असा आरोप सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात केला आहे.मुंबईतील मद्यालये, पब्ज आणि हुक्का पार्लरचालकांकडून महिन्याला ४०-५० कोटी रुपयांचे हप्ते जमा होऊ शकतात आणि अन्य मार्गांनी उर्ररित रक्कम जमा करता येतील, अशा सूचना गृहमंत्री देशमुख यांनी दिल्या होत्या, असा आरोप सिंह यांनी केला. मुंबईच्या आयुक्तपदावरून बदली झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलेल्या आठ पानी पत्रांत गृहमंत्री देशमुख यांच्यावर अनेक आरोप केले.