केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह, भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्यासारख्या अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी खास दिमतीला असलेल्या हेलिकॉप्टरमधील इंधन संपल्यामुळे रस्त्यात बंद पडलेली मोटार ढकलत न्यावी, तसे हे हेलिकॉप्टर पोलिसांच्या मदतीने ढकलण्याची वेळ आली. या हेलिकॉप्टरमधील इंधन सतत भरावे लागत होते, अशी माहिती आता पुढे आली आहे. दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या अंत्यदर्शनाला जाण्यास व आणण्यास जी दोन हेलिकॉप्टर सज्ज ठेवली होती, त्यांच्या बाबतीत झालेला हा प्रकार लातूर विमानतळावर अनेकांनी पाहिला.
लातूरच्या विमानतळावर अतिमहत्त्वाच्या व्यक्ती आल्याने तेथे त्यावेळी पाच विमाने होती, तर १६ व २४ आसनक्षमतेची दोन हेलिकॉप्टर होती, मात्र, जागा कमी असल्याने पोलिसांच्या मदतीने विमानाला ढकलून हलविल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही मान्य केले.
परळीतील दगडफेकीनंतर जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांनी केलेल्या चुकांची यादीच भाजपचे नेते वाचून दाखवत आहेत. गृहमंत्री व देशातील प्रमुख नेते आल्यानंतर त्यांची सुरक्षा व्यवस्था नीट न झाल्याने पोलीस महानिरीक्षकांकडून सुरक्षेचा आढावा सुरू केला आहे. मात्र, हवाई वाहतुकीतही कमालीचा गोंधळ होता, अशीही माहिती समोर आली आहे.
हवाई वाहतूक सुरळीत व्हावी, यासाठी आवश्यक इंधन पुरवठा बिदर जिल्ह्य़ातून केला होता. मात्र, इंधन संपल्याने व जागा नसल्याने हेलिकॉप्टरला ढकलून नेण्याशिवाय दुसरा पर्यायच नव्हता. आसनक्षमता व इंधनाचा सहसंबंध असतो. जेवढे प्रवासी अधिक तेवढे इंधन अधिक असे सूत्र असले, तरी अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी केल्या जाणाऱ्या व्यवस्थेत वारंवार इंधन भरावे लागणे, ही प्रक्रिया तांत्रिकदृष्टय़ा चुकीचीच असल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञ सांगतात.
केवळ १९ अतिमहत्त्वाच्या व्यक्तींचा दौरा प्रशासनाकडे आला होता. प्रत्यक्षात ४७ नेते हवाई मार्गाने पोहोचल्याने सुरक्षा यंत्रणेवरील ताण वाढला. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या येण्याविषयीची काहीही माहिती प्रशासनाला नव्हती. रात्रीतून ९ हेलिपॅड उभारल्याचा दावा बीडचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केला. अंत्यसंस्काराची जागा निश्चित करण्यात झालेला विलंब व तीन ठिकाणी अंत्यदर्शन होणार असताना ऐनवेवळी ते एकाच जागी झाल्याने गोंधळ उडाल्याचेही सांगितले जाते.
खुलाशाचा चेंडू हवाई दलाकडे!
‘हेलिकॉप्टरची बलगाडी’ हा नवाच प्रकार समोर आल्याने अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून त्याचा खुलासा हवाई दलानेच करावा, अशी भूमिका  लातूरचे जिल्हाधिकारी विपिन शर्मा यांनी घेतली आहे.