अथांग समुद्र आणि निसर्गसौंदर्याचे लेणे लाभलेल्या अंदमान येथील नियोजित विश्व साहित्य संमेलन सावरकरभक्तांसह साहित्यप्रेमी रसिकांना खुणावत असतानाच संमेलनाच्या आयोजनाचा ठेका घेणाऱ्या पुण्याच्या ऑफबिट डेस्टिनेशन्स संस्थेने अन्य प्रवासी संस्थांच्या माध्यमातून अंदमानला जाणाऱ्यांना प्रतिनिधी शुल्क भरणे सक्तीचे केले आहे. साहित्यप्रेमींना या शुल्कापोटी ३ हजार रुपये भरावे लागणार आहेत.

स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर स्मृती सुवर्णमहोत्सवी वर्षांचे औचित्य साधत येत्या ५ व ६ सप्टेंबरदरम्यान पोर्टब्लेअर येथे होणाऱ्या या संमेलनाच्या अध्यक्षपदाचा मान नांदेडचे भूमिपुत्र, विचारवंत-लेखक प्रा. शेषराव मोरे यांना मिळाला. मोरे यांचा हा सन्मान ‘याचि देही याचि डोळा’ बघण्यासाठी जिल्हय़ातून अनेक साहित्यिक, पत्रकार व साहित्यप्रेमींनी वेगवेगळ्या प्रवासी वाहतूक संस्थांच्या माध्यमातून प्रवास-भोजन-नाश्ता व तेथील निवासव्यवस्थेचे आरक्षण करून घेतले, पण या साहित्यप्रेमींना संमेलनात श्रोता म्हणून सहभागी होण्यासाठी अनिवार्य शुल्क (३ हजार रुपये!) भरावेच लागणार असल्याची बाब आता स्पष्ट करण्यात आली आहे.

अ. भा. मराठी साहित्य महामंडळाने या संमेलनाची घोषणा करताना प्रतिनिधी शुल्काची बाब स्पष्ट केली असली, तरी ज्यांना आयोजकांच्या भोजन-नाश्ता व्यवस्थेचा लाभ घ्यायचा नाही, अशांना प्रतिनिधी शुल्क भरावे लागणार नाही, अशी साहित्यप्रेमींची समजूत झाली होती. या पाश्र्वभूमीवर नांदेडहून एका स्थानिक प्रवासी संस्थेच्या माध्यमातून ५०हून अधिक जणांचे आरक्षण झाल्याची माहिती मिळाल्यानंतर संमेलनाचे संयोजक नितीन शास्त्री यांनी मसाप नांदेड शाखेच्या एका पदाधिकाऱ्याशी संपर्क साधून ३ हजार रुपये प्रतिनिधी शुल्क अनिवार्य व सक्तीचे असल्याचे स्पष्ट केले.

शुल्क भरून प्रतिनिधी झाल्याशिवाय संमेलनाचा उद्घाटन सोहळा व अन्य कार्यक्रम ज्या सभागृहात होतील, तेथे साहित्यप्रेमींना प्रवेशही मिळणार नाही, असे सांगण्यात आल्याने संमेलनाध्यक्षांच्या मायभूमीतून स्वतंत्रपणे अंदमानला जाणाऱ्या साहित्यप्रेमींनी या सक्तीला हरकत घेतली आहे. दोन दिवसांचे भोजन-नाश्ता व इतर छापील साहित्य यासाठी ३ हजार शुल्क आकारणे गैर व अवाजवी आहे, असे मसाप नांदेड शाखेचे कार्यवाह प्रभाकर कानडखेडकर यांनी म्हटले आहे.

नांदेडकर साहित्यप्रेमींची भावना त्यांनी महामंडळाचे सदस्य कौतिकराव ठाले यांच्या कानावर घातली.दरम्यान, संमेलनाचे संयोजक ऑफबिट डेस्टिनेशनने आपल्या व आपल्या सहयोगी संस्थांमार्फत अंदमानला जाऊ इच्छिणाऱ्यांना कमी-जास्त खर्चाचे तीन पर्याय दिले आहेत. यासंबंधीच्या माहितीपत्रकात प्रतिनिधी शुल्क ३ हजारचा कोठेही उल्लेख नसल्याचे दिसून येते, पण महामंडळाशी झालेल्या करारानुसार ३ हजार रुपये भरावेच लागतील, असे नितीन शास्त्री यांनी येथे कळवल्यामुळे साहित्यप्रेमी गोंधळून गेले आहेत.

ज्यांना संयोजकांच्या भोजन-नाश्ता व अन्य सुविधांचा लाभ घ्यायचा नाही, त्यांना संमेलनाध्यक्ष व इतर वक्त्यांची भाषणे ऐकण्याचे शुल्क देण्याची ही सक्ती अन्यायकारक असल्याची भावना मसाप नांदेड शाखेने व्यक्त केली. त्याच वेळी अ. भा. मराठी साहित्य महामंडळाने हे विश्व संमेलन ऑफबिट डेस्टिनेशन्सला विकले आहे काय, असा सवाल कानडखेडकर यांनी केला.

 

‘वऱ्हाडा’च्या खर्चाचे रहस्य!

येथे मिळालेल्या माहितीनुसार संमेलनाचे आयोजन करण्यात शिवसंघ प्रतिष्ठान या संस्थेने तयारी दर्शवली होती, पण महामंडळाने ४० जणांच्या विमान प्रवास व निवासव्यवस्थेची सक्ती त्यांच्यावर केली. त्यासाठी १६ लाख रुपये मोजावे लागतील, असे दिसून आल्याने या संस्थेने त्यास नकार दिला. संमेलनास येणाऱ्या साहित्यप्रेमींच्या भोजन-नाश्त्याची नि:शुल्क व्यवस्था करण्यास प्रतिष्ठान तयार होते, तरी त्यांचा प्रस्ताव नाकारण्यात आला. या पाश्र्वभूमीवर महामंडळ पदाधिकारी-सदस्य व अन्य असे ४०जणांचे ‘वऱ्हाड’ कोणाच्या खर्चाने अंदमानला जाणार, याचे रहस्य सक्तीच्या प्रतिनिधी शुल्कात दडल्याची चर्चा आहे.