औरंगाबाद जिल्ह्यात आज 23 नवे करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या आता 1 हजार 241 वर पोहचली आहे. जिल्हा प्रशासनाकडून ही माहिती देण्यात आलेली आहे. करोना विषाणुचा प्रादुर्भाव राज्यात दिवसेंदिवस अधिकच वाढत आहे. मुंबई, पुणे पाठोपाठ औरंगाबाद जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या गेल्या काही दिवसांमध्ये झपाट्याने वाढली आहे व दररोज रुग्ण संख्येत अधिकच भर पडत आहे.

आज आढळलेल्या रुग्णांमध्ये सहा महिला व 17 पुरूषांचा समावेश आहे. शहरातील सादाफ नगर, रेहमानिया कॉलनी, महेमूदपुरा, औरंगपुरा, एन-8, एन-4,गणेश नगर, ठाकरे नगर, एऩ-2, न्यायनगर, बायजीपुरा, पुंडलिक नगर, बजरंग चौक, एन-7, एमजीएम परिसर, एन-5 सिडको, एऩ-12, हडको, पहाडसिंगपुरा, भवानी नगर व गंगापूर तालुक्यातील वडगाव कोल्हाटी या भागातील रुग्ण आढळले आहेत.

करोना रुग्णांची संख्या दुप्पट होण्याचा गेल्या सात दिवसातील औरंगाबादचा दर १०.४३ असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ३८.१४ एवढे आहे. करोनाबाधितांच्या मृत्यूचा दरही सध्या ३.३४ एवढा आहे. १५ मार्च रोजी औरंगाबाद येथे विदेशातून आलेल्या एका महिलेला करोनाची बाधा झाली होती. त्यानंतर एप्रिल महिन्यापासून करोनाबाधितांची संख्या वाढण्यास सुरुवात झाली. एप्रिलच्या पहिल्या आठवडय़ात १० रुग्ण होते. एप्रिल २० पर्यंत ही संख्या शंभपर्यंत गेली होती. या काळात गर्दी करू नका असे सांगताना प्रशासनाच्या नाकीनऊ आले होते. काही मोहल्लयांमधून करोना चाचणीला विरोध होत असे. केले जाणारे सर्वेक्षण नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) किंवा राष्ट्रीय सुरक्षा नोंदणी  (एनआरसी) साठी नाही, हे सांगण्यातच महापालिका कर्मचाऱ्यांना त्रास होत असे, पण औरंगाबादकर संपर्क वाढवत गेले. याच काळात चाचण्यांचा वेगही वाढविण्यात आला. लक्षणे नसणाऱ्या पण संपर्कात आलेल्या व्यक्तींचे नमुने सकारात्मक येऊ लागले.‘वाढीचा हा वेग दिवसाला १०० पर्यंत गेला. पण तो कायम राहिला नाही. त्यामुळे करोनाबाधितांची संख्या वाढेल पण त्याच्या प्रसाराचा वेग आटोक्यात राहू शकतो, असा दावा महापालिका आयुक्त अस्तिककुमार पांडेय यांनी‘ लोकसत्ता’ शी बोलताना केला.