अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरण दिवसेंदिवस पसरत चाललं आहे. सुशांत प्रकरणातील संशयित आरोपी रिया चक्रवर्तील अमली पदार्थ सेवन केल्याप्रकरणी अटक झाली आहे. मात्र अटक होण्यापूर्वी रियानं सुशांतच्या बहिणीविरोधात तक्रार दिली होती. त्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला. तातडीनं गुन्हा दाखल केल्यानं भाजपा नेते आशिष शेलार यांनी शंका उपस्थित केली आहे.

सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणाचा तपास सुरू आहे. या प्रकरणात रिया चक्रवर्तीची चौकशी सुरू असून, रियानं अटक होण्यापूर्वी म्हणजे ८ सप्टेंबरला सुशांतच्या बहिणीविरूद्ध वांद्रे पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवरून सुशांतची बहीण प्रियंका सिंह, दिल्लीतील राम मनोहर लोहिया रुग्णालयाचे डॉ. तरुण कुमार आणि अन्य काही जणांविरोधात गुन्हा दाखल झाला होता. यात सुशांतच्या बहिणीवर त्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झालेला आहे.

या कारवाईवरून भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. “रियाने अटकेच्या वेळेस वांद्रे पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि दोन तासात सुशांत सिंह राजपूतच्या बहिणीविरूद्ध एफआयआर दाखल झाला. परंतु सुशांतच्या मृत्यू प्रकरणात ६५ दिवस एफआयआर दाखल का झाला नाही? रियाला हे कोण सांगतेय? ड्रग्ज, पब आणि पार्टी गँग?,” असा सवाल शेलार यांनी केला आहे.

ड्रग्ज प्रकरणात नाव समोर आल्यानंतर रिया चक्रवर्तीची अमली पदार्थविरोधी विभागानं चौकशी सुरू केली होती. याप्रकरणात तिला अटकही झाली आहे. मात्र, अटक होण्यापूर्वीच रियानं सुशांतच्या बहिणीवर त्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याची तक्रार दिली होती.