अशोक चव्हाण यांचे मत
मंत्रालयात जाळ्या लावून काही काम होणार नाही तर शेतकऱ्यांच्या मालाला योग्य दाम आणि बेरोजगारांच्या हाताला काम दिले पाहिजे या दोन गोष्टी साध्य झाल्या तर राज्यात कुठेच जाळ्या लावण्याची गरज पडणार नाही असे प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी शिर्डीत केले.
प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी शनिवारी मध्यान्ह आरतीपूर्वी साई समाधीचे दर्शन घेतले. यावेळी राज्याचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील, रणजित देशमुख, आ.भाऊसाहेब कांबळे, माजी विश्व्स्त अशोक खांबेकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी प्रदेशाध्यक्ष चव्हाण मंत्रालयात दिवसेंदिवस शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रकार वाढत असून राज्यातील परिस्थिती अतिशय स्फोटक होत चालली आहे. मराठवाडय़ासह विदर्भ, महाराष्ट्रात गारपिटीमुळे प्रचंड नुकसान झाले आहे. एकंदरीत शेतकऱ्यांची अवस्था कर्जमाफी संदर्भात असो अथवा मालाला आधारभूत किंमत तसेच बोंड अळीच्या बाबतीत असो शासनाकडून मिळणाऱ्या सुविधेत या सरकारने दिरंगाई केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याशिवाय दुसरा पर्याय उरला नाही. अशी सगळ्या विषयाची शोकांतिका आहे. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी वारंवार सभागृहात आणि सभागृहाच्या बाहेर विषय लावून धरला आहे. विषय जरी क्लिष्ट असला तरी कुठेतरी राजकीय इच्छाशक्ती असली पाहिजे. दुर्दैवाने याला राजकीय रंग देण्याचे काम सत्ताधारी पक्ष करीत आहे. अहमदनगर येथील कालच्या उपमहापौर छिन्दम यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यावर बोलताना ते म्हणाले अतिशय गंभीर बाब असून भाजपच्या वैचारिक दिवाळखोरीचे लक्षण आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे देशाचे आराध्य दैवत आहे. त्यांच्याबद्दल लोकांमध्ये खूप आदराची भावना आहे. असे बेजबाबदारपनाचे वक्तव्य करतात याबाबत उपमहापौरच नव्हे तर त्यांच्या पक्षाने माफी मागावी.