पोलीस तपासात आरोपीची कबुली

बीड :  रेमडेसिविरच्या रिकाम्या बाटलीत पाणी भरून विक्री करण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका खासगी रुग्णालयातील तीन कर्मचाऱ्यांस पोलिसांनी अटक केली आहे. संतोष नाईकवाडे, दत्ता निर्मळ व प्रकाश नागरगोजे अशी या तीन आरोपींची नावे असून इंजेक्शन ताब्यात घेतल्यानंतर त्याची तपासणी पोलिसांनी करून घेतल्याने हा प्रकार उघडकीस आला.

बीड  जिल्ह्यात रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा असताना आठवडाभरापूर्वी पोलिसांनी एका इंजेक्शनची बावीस हजार रुपयांना विक्री करण्याच्या प्रयत्नातील तिघांना अटक केली. तीन दिवसांच्या पोलिस कोठडीनंतर मंगळवारी तिघांचीही रवानगी न्यायालयीन कोठडीत झाली. पोलिसांनी केलेल्या तपासात धक्कादायक बाब समोर आली. तिघांपैकी दत्ता निर्मळ हा एका खासगी कोविड रुग्णालयात कर्मचारी म्हणून काम करत होता. त्या ठिकाणी रुग्णांना वापरलेल्या रेमडेसिविर इंजेक्शनच्या रिकाम्या बाटल्या त्याने जमा केल्या. त्यामध्ये इंजेक्शनच्या साहाय्याने सलाइनचे पाणी भरून ते रेमडेसिविर असल्याचे भासविले.

सदर रेमडेसिविर मित्रांमार्फत बावीस हजार रुपयांना एक याप्रमाणे विक्री करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे त्यांचा डाव फसल्याने ते जाळ्यात अडकले. इंजेक्शनमध्ये सलाइनचे पाणी भरून तेच इंजेक्शन विक्री करणार असल्याची कबुली दत्ता निर्मळ याने पोलीस तपासात दिली. पोलिसांनी ताब्यात घेतलेले इंजेक्शन तपासणीसाठी मुंबईच्या प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आले आहे.