जिल्ह्य़ाच्या आणि राज्याच्या राजकारणातही परस्परांचे परंपरागत कडवे विरोधक असलेले, एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी न सोडणारे काँग्रेसचे नूतन प्रदेशाध्यक्ष आ. बाळासाहेब थोरात व भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे यांनी आज, सोमवारी चक्क एकाच विमानात शेजारी-शेजारी बसून शिर्डी ते दिल्ली असा प्रवास केला. कट्टर विरोधक असलेले विमानात ‘सख्खे शेजारी’ बनल्याचे छायाचित्र लगेच सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने जिल्ह्य़ात तो एक चर्चेचा विषय झाला. दरम्यान आ. थोरात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची मुंबईत गुरुवारी (दि. १८) समारंभपूर्वक सूत्रे स्वीकारणार आहेत. त्यांच्या समवेत पाच प्रदेश कार्याध्यक्षही पदाची सूत्रे स्वीकारणार आहेत.

संसदेच्या अधिवेशनाची शनिवार व रविवार अशी दोन दिवसांची सुटी संपवून खा. डॉ. विखे पुन्हा दिल्लीकडे निघाले होते. तर आ.थोरात यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर तेही पक्षश्रेष्ठींच्या भेटीसाठी दिल्लीला निघाले होते. शिर्डी विमानतळावर येईपर्यंत दोघांना आपण एकमेकांचे काही काळासाठी का होईना सख्खे शेजारी होणार आहोत, याची नव्हती. मात्र स्पाईस जेटच्या सकाळी १०.३० वाजता उड्डाण करणाऱ्या विमानात दोघांना शेजारी-शेजारी असलेल्या सीटवरच जागा मिळाली. हा केवळ योगायोग होता की अन्य काही याची मात्र कोणालाच कल्पना नव्हती.

मात्र थोरात-डॉ. विखे यांचे विमानात शेजारी-शेजारी बसलेले छायाचित्र दुपारी सोशल मीडियावरुन व्हायरल झाले. ते कसे झाले, याची कोणालाच कल्पना आली नाही, मात्र सख्खे शेजारी बनलेल्या कट्टर विरोधकांची चर्चाही तितक्याच वेगाने व्हायरल होऊ लागली. शेजारी बसल्यावर दोघांत निश्चितच चांगल्या गप्पा रंगल्या असतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

थोरात व विखे ही दोन्ही घराणी जिल्ह्य़ाच्या व राज्याच्या राजकारणात परस्परांची कट्टर विरोधक आहेत. सहकारी दिवंगत नेते व आ. थोरात यांचे वडील भाऊसाहेब थोरात व स्व. बाळासाहेब विखे यांच्यातही ही परंपरा जोपासली गेली होती. ती पुढे आ. थोरात व मंत्री राधाकृष्ण विखे यांच्यामध्ये आणखी जोरदार पद्धतीने जोपासली गेली. तीच आता आ. थोरात व मंत्री राधाकृष्ण यांचे चिरंजीव व भाजपचे खा. डॉ. विखे यांनीही पुढे सुरु ठेवली आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत तर परस्परांवरील टीकाटिप्पणी व आरोप-प्रत्यारोपांना तर बहरच आला होता. डॉ. विखे यांना राष्ट्रवादीची उमेदवारी मिळू नये, यासाठी थोरात यांनी प्रयत्न केल्याचा आरोप मंत्री राधाकृष्ण विखे यांनी केला होता. थोरात प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतरही त्यांना शुभेच्छा देण्याच्या निमित्ताने विखे यांनी त्यांच्यावर शरसंधान केले होतेच.

दरम्यान, दिल्लीहून परतताच आ. थोरात मुंबईत मंत्रालयासमोरील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात गुरुवारी दुपारी एक वाजता पक्षाचे महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खरगे व माजी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत पदभार स्वीकारणार असल्याची माहिती प्रदेश सरचिटणीस विनायक देशमुख यांनी दिली.