बिहार निवडणुकीत भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरत असून आता मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मतमोजणीत तिसऱ्या क्रमांकावर असल्याने भाजपा नितीश कुमार यांना पुन्हा मुख्यमंत्री होण्याची संधी देणार की त्यावर दावा करणार यावरुन अनेक तर्क-वितर्क लढवले जात आहे. अंतिम चित्र निकाल आल्यानंतरच स्पष्ट होईल. भाजपाचे वरिष्ठ नेते कैलाश विजयवर्गीय यांनी नितीश कुमार हेच मुख्यमंत्री होतील असं सांगितलं आहे. दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री झाल्यास नितीश कुमार यांनी शिवसेनेचे आभार मानले पाहिजेत असं म्हटलं आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

“बिहारमध्ये भाजपाचे नेते नितीश कुमार मुख्यमंत्री होतील असं एका सूरात सांगत आहेत. यासाठी नितीश कुमार यांनी शिवसेनेचे आभार मानले पाहिजेत. कारण जो खेळ महाराष्ट्रात खेळण्याचा प्रयत्न झाला. त्यावर आम्ही जो पलटवार केला त्यानंतर भाजपा आपल्या मित्रांशी तसं करणार नाही. शब्द फिरवल्यानंतर काय होऊ शकतं हे महाराष्ट्राने दाखवून दिलं आहे. नितीश कुमार मुख्यमंत्री होतील आणि भाजपाला त्यांना करावंच लागेल,” असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

आणखी वाचा- Bihar Election: संजय राऊतांनी केलं फडणवीसांचं अभिनंदन, म्हणाले…

फडणवीसांचं अभिनंदन
फडणवीसांचं अभिनंदन करताना संजय राऊत यांनी सांगितलं की, “नक्कीच…जे जिंकले त्यांचं अभिनंदन करण्याची आमची परंपरा आहे. फडणवीस बिहारचे प्रमुख होते. त्यांना महाराष्ट्राचा दांडगा अनुभव आहे. त्यांनी येथून बिहारमधील सूत्रं नक्कीच हलवली असतील. संपूर्ण केंद्रीय सत्ता तिथे कामाला लागली होती. मोदींनी १७ ते १८ सभा घेतल्या. तरीही ३० वर्षांचे तेजस्वी यांनी सर्वांना कामाला लावलं. तोंडाला फेस आणला हे मान्य करावं लागेल”.

आणखी वाचा- “पृथ्वीवरुन चांद्रयान नियंत्रित होतं, मग ईव्हीएम हॅक होणं शक्य नाही का?”

नितीश कुमारांवर टीका
“ज्या पक्षाचा नेता तीनवेळा मुख्यमंत्री राहिला असेल आणि तिसऱ्या क्रमांकावर जात असेल तर विचार करण्याची गरज आहे. याबद्दल आत्मचिंतन, विश्लेषण केलं पाहिजे. विकासाचा मुद्दा योग्य असल्याचं जनतेने दाखवून दिलं आहे,” अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.

तेजस्वी कुमार यांचं कौतुक
“कधी कधी लोक सामना हारतात. पण हारणाऱ्या संघाच्या खेळाडूला संघर्ष करत संघाला पुढे नेल्याबद्दल ‘मॅन ऑफ द मॅच’ दिलं जातं. बिहार निवडणुकीत तेजस्वी यादव यांच्यासारखा एक चेहरा राष्ट्रीय राजकारणातील नवा चेहरा म्हणून पुढे आला आहे. ३० वर्षाचा एक तरुण ज्याच्या जवळ कोणी मदतीला नाही, मित्रपक्षांचं समर्थन नाही, कुटंबाचा पाठिंबा नाही, केंद्रात विरोधी पक्ष आहेत अशा प्रतिकूल परिस्थितीत प्रधानमंत्र्यांपासून ते राज्याच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत एकटा लढत असेल आणि निवडणूक आपल्याभोवती आणत असेल तर बिहारला एका नवा राजकीय चेहरा मिळाला आहे. यावर आगामी दिवसात विश्वस ठेवून भविष्य पाहू शकतो,” अशा शब्दांत संजय राऊत यांनी कौतुक केलं आहे.

“राजकारणात आता कोणतीही नैतिकता नाही, तसं असतं तर महाराष्ट्रातही राजकारण बदललं असतं. महाराष्ट्रातल्या कोणत्याही आत्महत्या किंवा मृत्यूचा फायदा कोणाला झाला असं वाटत नाही. तेजस्वी यांनी प्रचारात जी उसळी घेतली आणि विकास, शिक्षण, बेराजगाराचा मुद्दा आणला त्यानंतर सगळे मुद्दे मागे पडले. शिक्षण, विकास, रोजगार, आरोग्य यावर प्रचारात चर्चा झाली याचं श्रेय तेजस्वी यादव यांनाच जातं. काँग्रेसला चांगली कामगिरी करता आली असती तर तेजस्वी यादव मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत सर्वात पुढे असते,” असं संजय राऊत यांनी सांगितलं. तेजस्वी यादव यांना मदत करता आली तर पहावी अशी शिवसेनेची भूमिका होती असंही यावेळी ते म्हणाले.