‘सत् सीता रामचंद्र की जय’, ‘प्रभू रामचंद्र की जय’, ‘बोला बजरंगबली की जय’च्या जयघोषात शेकडो दिवटय़ांच्या (मशाली) व सासनकाठय़ांच्या साक्षीने तसेच हजारो रामभक्तांच्या उपस्थितीत श्रीक्षेत्र चाफळ (ता. पाटण) येथील ३६७ वा रामनवमी उत्सव उत्साहात संपन्न झाला. गुलाल, खोब-यांची उधळण अन् पुष्पवर्षांवात मंगळवारी दुपारी ठीक १२ वाजून २० मिनिटांनी प्रभू श्रीरामचंद्रांचा जन्मसोहळा मंगलमय वातावरणात पार पडला. दरम्यान, ‘राम जन्मला गं सखे, राम जन्मला’ हे अजरामर गीत सुहासिनींसह रामभक्तांच्या ओठावर सहज रेंगाळत होते.
लाखो भाविकांचे अढळ श्रद्धास्थान असलेल्या चाफळच्या राममंदिरात रामनवमी उत्सवात नवमी, दशमी व एकादशी हे तीन मुख्य दिवस असून, चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून म्हणजेच गुढीपाढव्यापासून यात्रेस प्रारंभ होतो. यात्राउत्सव १२ दिवस चालला आहे. आज रामनवमीच्या मुख्य दिवशी मंदिरात पहाटे साडेचार वाजता काकड आरती, साडेपाच वाजता श्रीरामचंद्रांच्या मूर्तीचे पूजन व रामनामाचा जप, ६ ते साडेआठ गीतापाठ, साडेआठ ते १० भजन व आरती, ११ वाजता राममंदिराला १३ प्रदक्षिणा घालत प्रदक्षिणांच्या चालीवर श्रीराम, मारुती, शंकर, माता कृष्णामाई, गोपालकृष्ण व श्रीगणेश अशा देवांच्या आरत्या पार पडल्या. नंतर सालाबादप्रमाणे दुपारी ठीक १२ वाजून २० मिनिटांनी रामजन्म सोहळा अपूर्व उत्साहात पार पडला. आज मुख्य दिवशी श्रीरामास अभ्यंगस्नान घातल्यावर त्यांची विधिवत पूजा, पौरोहित्य विधी, वासुदेव पूरकर व दत्तात्रय कुलकर्णी यांनी केले. श्रीरामास न्हाऊ घातल्यानंतर पाळण्यात घालण्यात आले. पाळणागीतानंतर श्रीरामास अधिकारी बाळासाहेब स्वामी यांच्या ओटय़ात देण्यात आले. याप्रसंगी के. बी. क्षीरसागर यांचे लळिताचे कीर्तन झाले. या वेळी सर्वश्री बाळासाहेब स्वामी, वैजयंती स्वामी, भार्गवी स्वामी देवस्थान समितीचे अध्यक्ष सुभाषराव जोशी, कराड अर्बन बँकेचे अध्यक्ष डॉ. सुभाषराव एरम, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप गुरव, पाटण पंचायत समिती सदस्य राजेश पवार यांची उपस्थिती होती. श्रीराम जन्मसोहळय़ानंतर सर्व भाविकांना सुंठवडा व महाप्रसाद देण्यात आला. लळिताच्या कीर्तनास पेटीसाथ रामचंद्र देवरे यांनी केली, तर भानुदास ओतारी यांनी तबलासाथ केली.
उद्या बुधवारी दशमीला सकाळी समर्थवंशज श्रीक्षेत्र चाफळनगरीतून भिक्षावळ गोळा करतील. यंदा दोन दिवस दशमी असल्यामुळे उद्या बुधवारी सायंकाळी ७ वाजल्यानंतर सवाया आरती होऊन शेकडो मशालींच्या रांगेतून श्रीराम व मारुतीची चांदीची मूर्ती पालखीमध्ये ठेवून छबीना काढला जाईल. हा छबीना दर्शनी पाय-यांवरून रथाचे मानकरी साळुंखे बंधू यांच्यामार्फत रथाकडे नेला जाईल. तद्नंतर रथामध्ये विमान ठेवण्यात येईल. हा सोहळा पाहण्यासाठी चाफळसह पंचक्रोशीतील व ठिकठिकाणाहून आलेल्या हजारो भाविकांची उपस्थिती राहणार आहे. शुक्रवारी एकादशीला सूर्योदयापूर्वी श्रीरामाची विमानरूपी पालखीत प्रतिष्ठापना करून रथातून मिरवणूक काढली जाईल. उत्सवाचे सुयोग्य नियोजन करण्यात आले असून, श्रीराम देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सुभाषराव जोशी, उपाध्यक्ष दिलीप पाठक, अमरसिंह पाटणकर, मारुतीबुवा रामदासी, भूषण स्वामी, अरुण गोडबोले, व्यवस्थापक बा. मा. सुतार हे उत्सवाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेत आहेत. उत्सवादरम्यान, कराडचे पोलीस उपअधीक्षक मितेश घट्टे-पाटील, उंब्रज पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक एम. के. पाटील, फौजदार विजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त तैनात आहे.