बिटकॉईनमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने पुण्यासह देशभरातील हजारो नागरिकांची फसवणूक केल्याच्या प्रकरणातील मुख्य सूत्रधारांना पुणे पोलिसांनी अखेर अटक केली आहे. परदेशातून दिल्ली विमानतळावर उतरताच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. न्यायालयाने त्यांना १३ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांकडून या प्रकरणात चौकशी सुरू झाली असून, फसवणूक झालेल्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

पोलीस आयुक्त रश्मी शुल्का यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत याबाबतची माहिती दिली. अमित महेंद्रकुमार भारद्वाज(वय ३५) आणि विवेककुमार महेंद्रकुमार भारद्वाज (वय ३१, दोघेही रा. शाहिपूर व्हिलेज, शालीमार बाग, नवी दिल्ली) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्याविरोधात दत्तवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. आरोपी अमित आणि विवेककुमार हे दोघे भाऊ फसवणुकीच्या गुन्ह्यतील  मुख्य सूत्रधार आहेत. त्यांचे वडील महेंद्रकुमार भारद्वाज हेही या प्रकरणात सामील आहेत.

अमित भारद्वाज याने सिंगापूरमध्ये एप्रिल २०१४ मध्ये गेन बीटकॉईन (जीबी २१) नावाची कंपनी सुरू केली. अमित भारद्वाज याचे वडील महेंद्रकुमार भारद्वाज याला कंपनीचा प्रमुख करण्यात आले होते. त्यानंतर कंपनीची गेन बीटकॉईन नावाचे संकेतस्थळ सुरू केले.‘क्लाऊड मायनिंग’ करणार असल्याचे सांगून त्यासाठी  कमीत कमी गुंतवणूक ०.१ बिटकॉईन इतकी ठेवण्यात आली होती. त्यानंतर एमकॅप फेज वन नावाची कंपनी स्थापन केली. या कंपनीत गुंतवणूक केल्यास चार महिन्यात २०० टक्के नफ्याचे आमिष दाखविण्यात आले. मात्र, गुंतवणूकदारांना काही मिळाले नाही. त्यानंतर सात महिन्यांनी पुन्हा दुसरी एमकॅप फेज २ अशी कंपनी  काढून ४०० टक्के नफ्याचे आमिष दाखविण्यात आले. या प्रकरणात फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर १३ जानेवारीला एका महिलेने दत्तवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.