महाराष्ट्र सरकारला आता असं वाटतंय की करोनाशी लढाई संपली आहे आणि आता कंगनाशी लढायचं आहे असा टोला विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी ही टीका केली. कंगनासोबत लढण्यासाठी वापरत आहेत त्यातील ५० टक्के क्षमता जरी करोनाशी लढण्यासाठी वापरली तर लोकांचे जीव वाचतील असंही ते म्हणाले आहेत. तसंच दाऊदच्य घरावर कारवाई केली नाही पण अभिनेत्रीच्या घरावर केली अशी टीकाही त्यांनी केली.

आणखी वाचा- कंगना प्रकरणाशी सरकारचा संबंध नाही – शरद पवार

“या सरकारला आता करोना नाही कंगनाशी लढायचं आहे असं वाटतंय. संपूर्ण प्रशासन कंगनाशी लढण्यासाठी सज्ज झालं आहे. त्यांना कोणती चौकशी करायची आहे ते करु शकतात. कंगनानेही ते सांगितलं आहे. पण कुठेतरी गांभीर्याने करोनाकडे लक्ष द्या. जितक्या तत्परतेने कंगनाची चौकशी करु वैगेरे सुर आहे त्यापेक्षा जास्त करोनाकडे लक्ष देण्याची गरज आहे. त्याच्यातील ५० टक्के क्षमता तरी करोनाशी लढण्यात वापरा, कदाचित लोकांचा जीव वाचवण्यात मदत मिळेल”.

आणखी वाचा- कंगना प्रकरण: महाविकास आघाडी सरकारमध्ये All Is Not Well

“महाराष्ट्रात रोज करोनाचा आकडा वाढत आहे. देशातील ४० टक्के मृत्यू महाराष्ट्रात झाले आहे. पण करोनासोबत लढायचं सोडून सरकार कंगनाशी लढत आहे,” असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. “कंगनाचा मुद्दा भाजपाने उचललेला नाही. तुम्ही कशाला कंगनाविरोधात बोलायला सुरुवात केली. राष्ट्रीय स्तरावर जाईल इतकं महत्त्व कशाला दिलं. तुम्ही जाऊन तिचं घर तोडलं,” असं सांगत फडणवीसांनी कंगना भाजपाच्या संपर्कात असल्याचा आरोप फेटाळला.