सांगली : सातत्याने टीका केल्यामुळेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घराबाहेर पडले, अशी टीका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील यांनी रविवारी सांगलीत केली.

आपत्तीची परिस्थिती घरात बसून लक्षात येत नाही. त्यासाठी प्रत्यक्ष बांधावर जाऊन निर्णय घ्यावे लागतात. याबाबत भाजपकडून सातत्याने टीका केल्याने मुख्यमंत्री ठाकरे घराबाहेर पडले, याबद्दल त्यांचे अभिनंदन असा टोला मारत पाटील म्हणाले, की सत्तेत नसताना ठाकरे अवकाळी पाऊस झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या बांधावर गेले होते. त्या वेळी त्यांनी पंचनाम्याची औपचारिकता न करता तत्काळ मदत देण्याची मागणीही केली होती. या वेळी अतिवृष्टीने शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. अशा वेळी राज्य शासनाने ओला दुष्काळ जाहीर करावा.

केंद्राकडून महाराष्ट्राला मदत देण्यात टाळाटाळ केली जात असल्याच्या आरोपाला उत्तर देताना पाटील म्हणाले, अगोदर राज्य सरकारने मदत जाहीर केली पाहिजे. स्वत:ची जबाबदारी झटकून केंद्र शासनाकडे  बोट करू नये. राज्य शासनाने मदतीसाठी केंद्र शासनाकडे लेखी मागणी केली आहे का? कागदावर अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची माहिती नोंदवली आहे का, असा सवाल करीत त्यांनी आम्हाला राज्य शासन काय करणार हे समजायला हवे असे सांगितले.

सिंचन योजनेची ‘ईडी’कडून चौकशी आणि ‘जलयुक्त शिवार’ची राज्य शासनाकडून चौकशी याचा काहीही संबंध नसल्याचेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि मुख्यमंत्री ठाकरे यांच्यातील पत्रोत्तराबाबत विचारले असता आ. पाटील म्हणाले, राज्यपाल या नात्याने ते मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवू शकतात. मात्र त्यांच्या वयाचे भान ठेवून उत्तर द्यायला हवे होते. राज्यपालांनी पत्रात व्यक्त केलेली मते योग्यच आहेत.