नाशिकमध्ये प्रकल्पासाठी आग्रह; रामदेव बाबांना साकडे

मुख्यमंत्र्यांचे शहर असणाऱ्या नागपूरच्या मिहान प्रकल्पात स्वामी रामदेव बाबांच्या पतंजली फुड पार्कला जागा मिळाल्यानंतर इतर भाजप आमदारांनाही पतंजलीची भुरळ पडल्याचे अधोरेखीत झाले आहे. विविध कृषी मालाच्या उत्पादनात आघाडीवर असणाऱ्या नाशिकमध्ये नागपूरच्या धर्तीवर कृषी प्रक्रिया केंद्राची उभारणी करावी, असे साकडे भाजपच्या येथील आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी रामदेव बाबांना घातले आहे.

नागपूरच्या मिहान प्रकल्पात रामदेव बाबांच्या प्रकल्पासाठी अतिशय कमी किंमतीत जागा उपलब्ध करून दिल्यावरून गदारोळ उडाला होता. पतंजली योग पीठातर्फे त्या ठिकाणी अन्न प्रक्रिया उद्योग अर्थात फुड पार्कची उभारणी करण्यात येणार असल्याचे सांगितले जाते. अहमदनगर जिल्ह्यातील प्रकल्पाद्वारे पतंजली दूग्ध व्यवसायात उतरत आहे.

केंद्रात व राज्यात भाजपची सत्ता आल्यापासून पतंजलीसारख्या देशी उत्पादनांना सुगीचे दिवस आले आहेत. यामुळे रामदेव बाबांना मागेल तेवढय़ा जागेची उपलब्धता सहज व जलद होत आहे. नागपूर सारखा प्रकल्प होण्याची नाशिकमध्ये क्षमता आहे.

या ठिकाणी द्राक्ष, डाळिंब, टॉमॅटो, कांदा, मिरची आदींचे विपूल उत्पादन घेतले जाते. शेतकऱ्यांच्या कृषिमालाला नियमितपणे चांगला मोबदला मिळणे, व्यापाऱ्यांची मक्तेदारी मोडीत काढण्यासाठी पतंजली योग पीठातर्फे नाशिकमध्ये अन्न प्रक्रिया उद्योग उभारला गेल्यास शेतकऱ्यांचा माल थेट प्रकल्पाला मिळू शकेल. या उद्देशाने आपण रामदेव बाबांची भेट घेऊन असा प्रकल्प नाशिक येथे उभारण्याची मागणी केल्याचे फरांदे यांनी सांगितले.

सकारात्मक प्रतिसाद

स्थानिक पातळीवर पतंजलीने प्रकल्प उभारल्यास नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या कृषिमालास योग्य भाव मिळेल तसेच युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार, ही बाब बाबांसमोर मांडण्यात आली. त्यांनी आपल्या साधकांमार्फत माहिती घेऊन या प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद देऊन अन्न प्रक्रिया प्रकल्प उभारण्याची तयारी दर्शविली आहे. यासाठी लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन निवेदन देण्यात येणार असल्याचे फरांदे यांनी सांगितले.