भाजपा खासदार संभाजीराजे यांनी मराठा आरक्षणावरुन आक्रमक भूमिका मांडली असून सरकारने काहीच केलं नाही तर रस्त्यावर उतरु असा इशारा दिला आहे. मराठा समाजाला वेठीस धरु नका सांगताना संभाजीराजे यांनी माझ्यासहित खासदार, आमदार, मंत्री, मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेत्यांची जबाबदारी असल्याचं म्हटलं आहे. राज्यकर्त्यांनी भूमिका मांडणं गरजेचं असून तुम्ही समाजासाठी काय करु शकता हे सरकारने आणि विरोधी पक्षातील नेत्यांनी राजकारण सोडून सांगावं असं आवाहन त्यांनी केलं आहे. ते औरंगाबादमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.

भाजपाने आंदोलनाला पाठिंब्याबद्दल बोलताना ते म्हणाले की, “मी काही कोणाला सुचवत नाही. मी समाजाचा घटक असून बाजू मांडत असतो. ते काय मांडतात तो त्यांचा प्रश्न आहे. त्यांची भूमिका त्यांना विचारा. समाजाची बाजू प्रामाणिकपणे सरकार दरबारी मांडायची ही माझी भूमिका आहे. २००७ पासून मी हे करत असून त्यासाठी मला कोणी आव्हान देऊ शकत नाही. ते काय मांडतात तो त्यांचा दृष्टीकोन आहे”.

“हे काही खुळं सरकार नाही ना…,” मराठा आरक्षणावरुन संभाजीराजे संतापले

दरम्यान चंद्रकांत पाटलांच्या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले की, “”मी जर चंद्रकांत पाटील असतो तर उत्तर दिलं असतं. मी संभाजी छत्रपती असून त्याबद्दल मला विचारा. त्याबद्दल मी भाष्य करतो. त्यांच्या मनात काय चाललं आहे, ह्रदयात काय मला काय माहिती, मी काही ज्योतिषी नाही. छत्रपती शिवाजी आणि शाहू महाराजांनी केव्हाच ज्योतिषी मानले नाहीत तर आम्ही कसे मानू”.

….तर रस्त्यावर उतरणार
“सरकारी दरबारी विषय पोहोचवायचा असेल तर रस्त्यावर आंदोलन करावं लागतं. ५८ मोर्चे काढून हा विषय पोहचवला आहे, सरकारला सर्व गोष्टी माहिती आहे. हे काही खुळं सरकार नाही ना, म्हणूनच ते सरकार झालं आहे. पुन्हा एकदा लोकांना वेठीस धरणं या मताचा मी नाही. मी शिव शाहूंचा वंशज असून सामान्यांची काळजी करणं कर्तव्य आहे. करोना संकट असल्याने लोकांचा जीव धोक्यात घालू शकत नाही. आंदोलन करावं की नाही हा नंतरचा प्रश्न आहे. सरकार कोणतीही दखल घेत नसेल तर रस्त्यावर उतरुन आंदोलन करावंच लागेल,” असा इशारा संभाजीराजेंनी दिला.

मुख्यमंत्र्यांसह विरोधी पक्षाचीही जबाबदारी
“सरकारच्या हातात अनेक गोष्टी आहेत. त्यामुळे सर्वात प्रथम जबाबदारी राज्यकर्त्यांची असून त्यात माझ्यासकट खासदार, आमदार, मंत्री, मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेत्यांची आहे. त्यामुळे समाजाला वेठीस धरु नका. इतर बहुजन समाजातील लोकांना कसा न्याय देत आहात? माझ्यासहित जो श्रीमंत वर्ग आहे त्यांना एक टक्काही मदत देऊ नका. पण जो ३० टक्के गरीब समाज आहे त्यासाठी अपवादात्मक मदत कशी करणार ते सांगा,” अशी मागणी संभाजीराजेंनी केली.