भारतात आता चमचेही कमी पडू लागले आहेत का? असा प्रश्न आपल्याला पडल्याचा एक किस्सा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितला आहे. पुण्यात मराठा चेंबर ऑफ कॉमर्सच्या कार्यक्रमात नितीन गडकरी उपस्थित होते. यावेळी बोलताना त्यांनी हा किस्सा सांगितला. “देशभरातील उद्योग व्यवसायांसंबंधी एक बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी चीनमधून उदबत्तीपासून प्लास्टिकचे चमचे देखील आपल्या देशात आयात केले जात असल्याची माहिती मिळाली, त्यावरून मी सेक्रेटरीला म्हटलं की, अपने हिंदुस्थान में चमचो की भी कमी पड गई क्या?,” असा किस्सा नितीन गडकरी यांनी सांगताच सभागृहात एकच हशा पिकला.

“आपल्या देशात उद्योग व्यवसाय वाढीसाठी अनेक उपक्रम हाती घेण्यात येत आहेत. त्यादृष्टीने रोजगारनिर्मिती आणि निर्यात वाढवण्यासाठी उद्योग जगताने प्रयत्न करावेत. सरकार त्यांच्या पाठिशी आहे. तसेच कृषी मालवाहतूक रेल्वेने वाढली पाहिजे, जेणेकरून वाहतूक खर्च कमी होण्यास मदत होईल. त्याचसोबत आता बांबूपासून तेल मिळत असल्याने बांबूशेतीला चालना देण्यात येणार आहे,” अशी माहिती यावेळी नितीन गडकरी यांनी दिली.

पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, “येत्या साडेतीन वर्षात दिल्ली-मुंबई हायवेचे काम पूर्ण होईल. यामुळे १३ ते १४ तासांमध्ये अंतर पार करता येणार आहे. त्याचबरोबर देशात अशा स्वरुपाचे आणखी तीन हायवे बनवले जात असून देशात 22 ग्रीन हायवेंचं काम प्रगतीपथावर आहे”.

“देशातील अनेक राज्यांमध्ये शहरांचे प्रमाण वाढत आहे. त्या सर्व शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर विकासकामे केली जात आहेत. तसंच पुणे आणि मुंबईसारख्या शहरात उद्योग आणि व्यवसायांचे मोठ्या प्रमाणावर केंद्रीकरण झाले आहे. यामुळे खूप मोठी समस्या झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर अशा शहरांच्या बाहेर देखील उद्योग व्यवसाय जाण्याची गरज असून त्यासाठी विकेंद्रीकरण करण्याची आवश्यकता असल्याचं,” यावेळी नितीन गडकरी यांनी सांगितलं.