वाढीव वीज बिलाच्या मुद्यावरुन राज्यातील राजकारण आता चांगलच तापलं आहे. काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सामान्यांना वाढीव वीज बिलातून थेट दिलासा देणारा कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. या पार्श्वभूमीवर आता विरोधी पक्ष भाजपाने अधिक आक्रमक भूमिका घेतली आहे. भाजपाकडून सोमवारी (२३ नोव्हेंबर) राज्यव्यापी वीज बिल होळी आंदोलन पुकारण्यात आलं आहे.

”करोनाच्या कठीण काळात आर्थिक परिस्थिती ढासळलेली असतानाच वाढीव वीज बिलांमुळे सर्व सामान्यांचे अतोनात हाल झाले आहेत. त्यात माजलेल्या सरकारने वीज बिल माफ करणार नाही असं म्हटलंय. त्यांचा हाच माज उतरवण्यासाठी जनतेच्या हितार्थ वीजबिल सवलतीसाठी भाजपाने वीजबिल होळी आंदोलन पुकारलं आहे.” असं भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

आणखी वाचा- “ठाकरे सरकार हे देशातले एकमेव राज्य सरकार असेल ज्यांनी…”; वीज बिलांवरुन भाजपा नेत्याचा हल्लाबोल

तर या अगोदर ”करोनाकाळातील वीजबिलांमध्ये सवलत देण्याचे जाहीर करून घूमजाव करणे, हा लाखो ग्राहकांचा विश्वासघात आहे.” असा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर केलेला आहे.

लोकांमधील असंतोषाची दखल घेत वीज बिलात सवलत देण्याची घोषणा ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केली होती. मात्र या सवलतीपोटी राज्य सरकारवर किमान दोन हजार कोटींचा आर्थिक भार पडणार असल्याने आणि राज्याची आर्थिक स्थिती नाजूक असल्याने हा निधी देण्याबाबत वित्त विभागाने आखडता हात घेतला. त्यामुळे ही सवलत देता येणार नसल्याची कबुली दोनच दिवसांपूर्वी ऊर्जामंत्र्यांना द्यावी लागली होती.

आणखी वाचा- “माझे कुटुंब माझी जबाबदारीच्या यशानंतर ठाकरे सरकारची नवीन योजना, माझे लाईट बिल माझी जबाबदारी”

राज्यातील शिवसेना – काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारला वीज बिलात सवलत देण्यास भाग पाडण्यासाठी सोमवार दि. २३ नोव्हेंबर रोजी भाजपातर्फे राज्यव्यापी वीजबिल होळी आंदोलन करण्यात येणार असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे चंद्रकांत पाटील यांनी आवाहन केले आहे.

लॉकडाउनच्या काळात राज्यातील नागरिकांना भरमसाठ वीजबिले आली. याबाबत सवलत देण्याचे महाविकासआघाडी सरकारने जाहीर केले होते. पण आता या सरकारच्या ऊर्जामंत्र्यांनीच स्वतः वीजबिलाबाबत दिलासा देता येणार नाही व नागिरकांना ती भरावी लगातील, असे स्पष्ट सांगितलं आहे. तर, दुसरीकडे महावितरण सक्तीने वीजबिलं वसूल करण्याच्या प्रयत्नात आहे. महाविकासआघाडी सरकारने जनतेचा विश्वासघात केला आहे. या सरकारला सत्तेच्या धुंदीतून जागे करण्यासाठी भाजपा वीज बिलांच्या होळीचे आंदोलन राज्यात सर्वत्र करणार आहे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.