सोलापूर महानगरपालिका सभागृह नेते महेश विष्णुपंत कोठे यांच्या विरोधात पक्षशिस्तभंगाची नोटीस काँग्रेस प्रदेश पक्षश्रेष्ठींनी बजावली आहे. शहराच्या राजकारणात काँग्रेसचे वजनदार नेते सुशीलकुमार शिंदे व कोठे यांच्यातील शीतयुध्दाला आता तोंड फुटल्याचे आता स्पष्ट झाले आहे. दरम्यान, महेश कोठे यांनी आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन शिवसेनेचा भगवा ध्वज खांद्यावर घेण्याची तयारी चालविली असून त्यामुळे शहरात काँग्रेस पक्ष फुटीच्या मार्गावर असल्याचे बोलले जात आहे.
 कोठे यांची महत्वाकांक्षी वाढली असून  त्यातूनच शिंदे यांच्याशी त्यांचे अनेक दिवसांपासून शीतयुध्द सुरू आहे.सोलापूर लोकसभा निवडणुकीत शिंदे यांचा दारूण पराभव झाल्यानंतर कोठे गट अधिक आक्रमक झाला आहे. त्यातूनच धास्तावलेले शिंदे हे ‘मवाळ’ झाल्याच्या         पाश्र्वभूमीवर पालिकेचे धडाकेबाज आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांची केवळ अकरा महिन्यात बदली झाल्यामुळे कोठे यांना महापालिकेत ‘मोकळे रान’ मिळाल्याचे बोलले जात असताना कोठे हे आणखी आक्रमक झाल्याचे मानले जाते.
 आता महेश कोठे यांनी आमदार प्रणिती शिंदे यांनाच आव्हान देत त्यांच्याच मतदारसंघातून शिवसेना किंवा अन्य कोणत्याही पक्षाकडून निवडणूक लढविणार असल्याचा मनोदय जाहीरपणे बोलून दाखविला आहे. एवढेच नव्हेतर त्यांनी शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकारी व मुंबईतील नेत्यांशी संपर्कही सुरू केला आहे. त्यांनी उघडपणे काँग्रेसच्या विरोधात भूमिका घेतल्यामुळे अखेर प्रदेश पक्षेश्रेष्ठींनी     त्याची दखल घेत कोठे यांना शिस्तभंगाची नोटीस बजावली आहे. प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या आदेशावरून प्रदेश सरचिटणीस अ‍ॅड. गणेश पाटील यांनी शुक्रवारी ही ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावून तीन दिवसात स्पष्टीकरण देण्यास फर्मावले आहे.
या पाश्र्वभूमीवर कोठे यांच्या भूमिकेकडे सर्वाचे लक्ष वेधले आहे. महापालिकेत कोठे यांना मानणारे सुमारे १५ नगरसेवक आहेत.   त्यांना काँग्रेसपासून फारकत घेतली तर महापालिकेतील काँग्रेसची सत्ता संपुष्टात येऊ शकते.