सीबीएसई अभ्यासक्रमानुसार होणाऱ्या दहावीच्या परीक्षेत औरंगाबादच्या रिव्हरडेल हायस्कूलच्या यश कुलकर्णी हा विद्यार्थी देशात पहिला आला. त्याला ५००पैकी ४९६ गुण मिळाले. यापूर्वी ४९५ गुणांचा विद्यार्थी प्रथम होता. त्याच्या यशामुळे नवा उच्चांक स्थापित झाला.
सीबीएसईचे अध्यक्ष विनीत जोशी यांनी दूरध्वनीवरून यश कुलकर्णी याचे अभिनंदन केले. ८० टक्क्य़ांपेक्षा अधिक विद्यार्थी विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण झाल्याचे रिव्हरडेलच्या मुख्याध्यापक डॉ. बी. के. मिश्रा यांनी सांगितले. यशचे वडील सचिन कुलकर्णी लष्करात कॅप्टन आहेत. ते मागील दीड वर्षांपासून रशियामध्ये कार्यरत आहेत. यशची आई अपर्णा कुलकर्णी म्हणाल्या की, शाळेत शिक्षकांनी घेतलेल्या मेहनतीमुळे हे यश त्याच्या पदरी पडले. यशला शास्त्रज्ञ व्हायचे आहे. मूलभूत विज्ञानाचा तो अभ्यास करणार आहे. त्याला अवांतर वाचनाचीही आवड आहे. त्याच्या यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.