चंद्रपूरमध्ये शेतकऱ्यांवर वाघ, बिबट्या अशा वन्यप्राण्यांकडून हल्ल्याच्या घटना वाढत असतानाच या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे आमदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांनी शेतकऱ्यांच्या हाती बंदुका देण्याची मागणी केली आहे. शेतातील पिक वन्यप्राणी उद्ध्वस्त करत असल्याने शेतकऱ्यांच्या हातात बंदुका द्याव्यात, अशी मागणी त्यांनी केली.

चंद्रपूरमधील अर्जुनीमध्ये वन अधिकाऱ्यांसोबत सर्व विभाग प्रमुखांची बैठक झाली. या बैठकीत धानोरकर म्हणाले, ग्रामस्थांनी गावात स्वच्छता राखावी, शौचाला उघड्यावर जाऊ नये,  ग्रामस्थांसाठी ५० शौचालय वन विभाग व ५० स्वत: बांधून देऊ असे त्यांनी सांगितले. वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना स्थायी नोकरी द्यावी, शेताला सौर ऊर्जेचे कुंपण लावावे, सर्व कर्मचाऱ्यांनी गावातच राहावे, दहशतीने शेतकरी व मजूर शेतात जाऊ शकत नसल्याने वन विभागाने पिके शेतातून आणण्याकरिता कर्मचारी व वाहने पुरवण्याची मागणी धानोरकर यांनी केली.

आमदार धानोरकर यांनी बिबट्यांच्या हल्ल्यात मृत पावलेले देवराव जिवतोडे, तुळसाबाई केदार, निर्मला श्रीरामे यांच्या वारसांना प्रत्येकी १० हजाराची आर्थिक मदत दिली. वन्यप्राण्यांचे हल्ले रोखण्यासाठी पोलिसांचे सहकार्य मिळत असले तरी इतर शासकीय विभाग सहकार्य करत नाहीत, अशी खंत वन अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. बैठकीला अर्जुनीच्या सरपंच यामिनी बोथले, पोलीस पाटील झिंगरे, ताडोबाचे उपवनसंरक्षक गजेंद्र नरवणे, एसीएफ दिव्या भारती, ताडोबा कोर उपवनसंरक्षक लडकते, वनपरिक्षेत्र अधिकारी मून, तहसीलदार सचिन गोसावी उपस्थित होते.