09 July 2020

News Flash

मुख्यमंत्री ठाकरेंच्या हस्ते जगातल्या सर्वांत मोठ्या प्लाझ्मा थेरपी ट्रायल केंद्राचा शुभारंभ

करोनाच्या उपचारात महाराष्ट्र जगाच्या पुढे, मुख्यमंत्र्यांचा दावा

करोनाच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी प्लाझ्मा थेरपीचा वापर राज्यात होत असून, त्यामुळे रुग्णांना त्याचा फायदा होत आहे. या थेरपीचा वापर व्यापक प्रमाणात होण्यासाठी महाराष्ट्रात जगातली सर्वात मोठी प्लाझ्मा थेरपी ट्रायल केली जात आहे. त्यामुळे आता करोनाला हरवून बरे झालेल्यां रुग्णांनी अन्य रुग्णांच्या उपचारासाठी प्लाझ्मा दान करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केले.

राज्यातील २३ वैद्यकीय महाविद्यालयात प्लाझ्मा थेरपी सुविधा करण्यात आली आहे. नागपूर येथील शासकीय महाविद्यालयात प्लॅटिना प्रोजेक्ट प्लाझ्मा थेरपी ट्रायल केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते.

यावेळी प्लाझ्मा डोनेशन, प्लाझ्मा बॅंक, प्लाझ्मा ट्रायल आणि ईर्मजन्सी ऑथराजेशन या चार सुविधांचेही उद्घाटन करण्यात आले. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून झालेल्या या सोहळ्यास महसुल मंत्री बाळासाहेब थोरात, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, उद्योगमंत्री सुभाष देसाई, आरोग्यमंत्री राजेश टोपे, उर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमीत देशमुख तसेच संबंधीत जिल्ह्यांचे पालकमंत्री आदी सहभागी झाले होते.

यावेळी मुख्यमंत्री  म्हणाले, गंभीर रुग्णांना बरे करण्यासाठी प्लाझ्मा थेरपीचा उपयोग प्रथमच होत आहे. आपल्याला अभिमान आहे की जगातली ही सर्वात मोठी सुविधा आपण आपल्या राज्यात सुरु करतो आहोत. आपण परंपरेनुसार एक पाऊल पुढे टाकले आहे. आपण रडत नाही बसलो तर लढत आहोत. राज्यात एप्रिलमध्ये प्लाझ्मा थेरपीचा पहिला प्रयोग केला होता. नंतर आपण केंद्राकडे परवानगी मागितली, पाठपुरावा केला, त्याला यश आले आहे.

आज कोरोनावर प्रभावी औषध आणि उपचार नाहीत. लक्षणानुसार काही विशेष औषधे दिली जात आहेत. लसीमुळे एन्टीबॉडी तयार केल्या जातात, पण इथे प्लाझ्मा थेरपीच्या माध्यमातून तयार एन्टीबॉडी आपण रुग्णाला देतो आहोत. रक्ताचा तुटवडा झाल्यावर आपण आवाहन करतो आणि रक्तदाते मोठ्या प्रमाणात पुढे येतात. आता ज्या रुग्णांनी कोरोनाला हरवल आहे. त्यांच्या रक्तातील प्लाझ्मा अन्य रुग्णांना देऊन त्यांना कोरोनामुक्त करण्यासाठीप्रयत्न झाले पाहिजे. १० पैकी ९ रुग्ण आपण बरे केले कारण त्यांना वेळेत प्लाझ्मा वेळेत देऊ शकलो. त्यामुळे प्लाझ्मा देण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत न थांबता आधीपासून तो देता येईल का? यावार विचार व्हावा, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

प्लाझ्मा बँक तयार करणे आणि ते शास्त्रीय पद्धतीने उपलब्ध करून देणे ही जबाबदारी आपणास पार पाडावी लागेल. दीड महिन्यांपूर्वी केंद्रीय पथक येऊन गेले तेव्हा राज्यात कोरोनाची विचित्र परिस्थिती होती, पण आता परवाच हे पथक परत येऊन गेले आणि त्यांनी महाराष्ट्र करीत असलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. करोनाच्या उपचारात महाराष्ट्र जगाच्या पुढे आहे. महाराष्ट्र प्रयत्न आणि प्रयोग करणारे, धाडसी राज्य आहे. कोरोना विरुद्धचे युद्ध आपण जिंकूच असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.

प्लाझ्मा दानाबाबत लोकांना आवाहन करावे – महसुलमंत्री बाळासाहेब थोरात
यावेळी महसुलमंत्री थोरात म्हणाले की, प्लाझ्मा थेरपीचा अभिनव प्रयोग आपल्या राज्यात होतोय ही अभिनंदनीय बाब आहे. गेले साडेतीन महिने सर्वच जण अहोरात्र मेहनत करून काम करतोय. मात्र अजुनही करोनाचे संकट संपलेले नाही. करोनाच्या रुग्णांना उपचारात मदत ठरणाऱ्या प्लाझ्मा दानाबाबत लोकांना आवाहन करावे, असेही त्यांनी सांगितले.

आरोग्य विभागामार्फत प्लाझ्मा संकलनासाठी यंत्र पुरविणार – आरोग्यमंत्री राजेश टोपे
आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, राज्यात २३ वैद्यकीय महाविद्यालयात ही सुविधा होणार आहे. जगात सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांवर प्लाझ्मा थेरपी उपचार केली जाते. मात्र महाराष्ट्र पहिले राज्य आहे जेथे सौम्य तसेच गंभीर रुग्णांवर या थेरपीने उपचार केले जात आहेत.  ज्या १० ठिकाणी वैद्यकीय महाविद्यालयांची सुविधा नाही, तेथे आरोग्य विभागामार्फत प्लाझ्मा संकलनासाठी लागणारे यंत्र पुरविले जाणार आहे. हा संकलीत केलेला प्लाझ्मा वैद्यकीय महाविद्यालयात पुरविला जाईल. प्लाझ्मा थेरपी उपचार यशस्विता दर हा ९० टक्के आहे. त्यामुळे आता जे रुग्ण करोनामुक्त झाले आहेत, त्यांनी अन्य रुग्णांसाठी प्लाझ्मा देण्यासाठी त्यांचे समुपदेशन करण्यात यावे, असेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. पालकमंत्री तसेच जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांनी प्लाझ्मा डोनेशनबाबत प्रयत्न करावेत असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

जगातले सर्वांत मोठे ट्रायल थेरपी केंद्र राज्याच्या उपराजधानीत – वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख
वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख म्हणाले की, कोरोनामुक्त झालेले रुग्ण आता संकटमोचक म्हणून प्लाझ्मा थेरपीच्या माध्यमातून पुढे येत आहेत. जगातली सर्वांत मोठी ट्रायल थेरपी केंद्र राज्याच्या उपराजधानीत सुरू केले आहे. प्लाझ्मा थेरपी यशस्वी करण्यासाठी जनतेमध्ये जागरूकता निर्माण करावी. करोनामुक्त रुग्णांनी प्लाझ्मा दानासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन देशमुख यांनी केले. जगातील सर्वात विक्रमी प्रणाली महाराष्ट्रात सुरू करून राज्याने जगासमोर आदर्श निर्माण केल्याचेही त्यांनी सांगितले.

कोल्हापूर येथे प्लाझ्मा थेरपी यशस्वी – राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर
राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर म्हणाले, प्लाझ्मा थेरपी कोरोनाच्या उपचारात महत्वाची भूमिका बजावत असून, कोल्हापूर येथे रुग्णावर केलेली प्लाझ्मा थेरपी यशस्वी झाली आहे.  यावेळी कोरोनामुक्त झालेल्या आणि प्लाझ्मा दान केलेल्या डॉ. विकास मैंदाळ यांनी मनोगत व्यक्त केले. वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव डॉ. संजय मुखर्जी यांनी प्रास्ताविक केले. वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी सुत्रसंचालन केले.

प्लाझ्मा थेरपीविषयी
महाराष्ट्रात २३ ठिकाणी वैद्यकीय महाविद्यालये, पालिका रुग्णालये या ठिकाणी थेरपीचा वापर करण्यास केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. यापैकी १७ ठिकाणी ही उपचार पद्धती कोविड रुग्णांसाठी सुरु होत आहे.

महाराष्ट्रात सर्व ठिकाणी ही व्यवस्था –
सीसीसीमधील रुग्ण जे बरे होऊन चालले आहेत तिथे १० दिवसानंतर २८ दिवसांच्या आत प्लाझ्मा दान केले पाहिजे
डॉक्टर्स आपल्या रक्तातून प्लाझ्मा स्वतंत्ररीत्या काढू शकतात. यात अँटीबॉडी असतात जी एखाद्या रोग्याला दिली जातात. यामुळे त्याची प्रतिरोधक शक्ती अधिक प्रभावीपणे काम करू शकते.  कोरोनाचे संकट सुरु झाल्यावर मुंबई महानगरपालिकेतील डॉक्टर्सनी अशा प्रकारे प्लाझ्मा थेरपीचा प्रयोग करून रुग्णांवर उपचार करण्याचे ठरविले.
प्लाझ्मा थेरपीमध्ये कोरोनातून ठिक झालेल्या व्यक्तींच्या रक्तातून प्लाझ्मा घेऊन करोनाग्रस्तांवर उपचार करण्यात येतात.

प्लाझ्मा थेरपी फायदेशीर असल्याचं म्हटलं जात आहे-  
प्लाझ्मा थेरपीमध्ये करोनातून पूर्णपणे ठिक झालेल्या व्यक्तीच्या शरीरातील रक्त घेतलं जातं. रक्ताचा वापर करून अँटीबॉडीजयुक्त प्लाझ्मा वेगळे केले जातात. यानंतर प्लाझ्मा करोनाची लागण झालेल्या रुग्णाच्या शरीरात इंजेक्ट केला जातो. जेव्हा शरीर कोणत्याही बॅक्टेरीयाच्या संपर्कात येते, तेव्हा रोगप्रतिकारक यंत्रणा स्वयंचलितपणे सक्रिय होते आणि अँटीबॉडीज रिलीज होतात. कोरोना विषाणूच्या संसर्गापासून बरे झालेल्या रूग्णांमध्ये प्लाझ्मामध्ये अँटीबॉडीज असतात जे आधी कोरोनाशी लढलेले असतात. हा प्लाझ्मा कोणत्या रुग्णाला द्यायचा हे डॉक्टर्स ठरवितात. मध्यम व तीव्र स्वरुपाची लक्षणे असलेल्या व नेहमीच्या औषध उपचारांनी बरा न होणारा, ऑक्सिजनची गरज असणारा रुग्ण निवडला जातो.
एखादा पूर्णपणे बरा झालेला रुग्ण www.plasmayoddha.in याठिकाणी आपली नोंद करून प्लाझ्मा देण्याची इच्छा व्यक्त करून एखाद्या रुग्णाचा जीव वाचवू शकतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 29, 2020 4:23 pm

Web Title: chief minister thackeray inaugurates worlds largest plasma therapy trial center msr 87
टॅग Coronavirus
Next Stories
1 मोठी बातमी: संपूर्ण महाराष्ट्रात लॉकडाउन कायम, ३१ जुलैपर्यंत निर्बंध लागू
2 … आणि आमचे स्वयंघोषित देशभक्त निघाले चिनी मालावर बहिष्कार टाकायला -जितेंद्र आव्हाड
3 इंधन दरवाढीविरोधातलं काँग्रेसचं आंदोलन बेगडी -फडणवीस
Just Now!
X