नागपूर मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याचं राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. या कार्यक्रमाला केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी सत्तेतून पायउतार झालेल्या भाजपाला चिमटा काढण्याची संधी सोडली नाही. मेट्रोच्या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, “आपण एका गाडीत बसू शकलो नाही, पण एका स्टेशनवर आलो आहे. यापुढे राज्य व केंद्र सरकारनं मिळून काम केलं, तर महाराष्ट्र-दिल्ली विकासाची मेट्रो सुरू करू शकू,” असं मुख्यमंत्री म्हणाले.

दुसऱ्या टप्प्यातील नागपूर मेट्रोचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लिंकद्वारे उद्घाटन केलं. मुख्यमंत्र्यांचं भाषण होण्यापूर्वी केंद्रीय नितीन गडकरी यांचं भाषण झालं. यावेळी गडकरी यांनी फडणवीस सरकारच्या काळात झालेल्या निर्णयांचं कौतूक केलं. त्याचबरोबर सध्याच्या सरकारनं विकासकामांचे प्रस्ताव पाठवावेत, अस आवाहनही केलं.

आणखी वाचा – नितीन राऊत, अनिल देशमुख यांच्या पाठिशी राजकारण न करता उभे राहू – नितीन गडकरी

त्यानंतर बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, “नितीन गडकरी यांनी वेळेच्या आत काम पूर्ण केलं आहे. तुम्ही म्हणाल असा कसा मुख्यमंत्री आहे. श्रेयच घेत नाही. राजकारणी म्हटल्यावर श्रेयवाद येतोच. पण, आम्हाला श्रेय नकोय, आम्हाला जनतेचे आशीर्वाद हवे आहेत. नागपूरकरांच्या आशीर्वादांची आम्हाला गरज आहे,” असं सागत नितीन गडकरी यांचं नाव न घेता मुख्यमंत्री म्हणाले,”आज आपण एका गाडीत बसू शकलो नाही, पण एका स्टेशनवर आलो आहोत. मुख्यमंत्र्यांनी हे अप्रत्यक्षरित्या तुटलेल्या युतीवरून आणि सत्तेतून बाहेर जाव्या लागलेल्या भाजपाला,” टोला लगावला.

“जगाच्या तुलनेत विकासाचा वेग साधला नाही, तर आपण मागे पडू. नागपूर राज्याची उपराजधानी आहे. त्यामुळे मुख्य शहराच्या विकासाच्या तुलनेत नागपूरला मागे पडू देणार नाही. ब्रॉड गेज मार्गाच्या प्रस्तावालाही तात्काळ मंजुरी देण्यात येईल. जगभरातील लोकं मुंबई, नागपूर आणि महाराष्ट्रातील मेट्रो बघायला यायला हवे, अशा पद्धतीनं काम करू. नागपूरच्या मेट्रोला माझी मेट्रो दिलेलं हे अतिशय कौतूकास्पद आहे. मला एकदा नागपूरकरांसोबत मेट्रोतून फिरायचं आहे,” असंही मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.