गेली काही वष्रे मुळ्या गटारांची सफाई न झाल्यामुळे ती गाळणे भरली. त्यामुळे अलिबाग शहरात पावसाळ्यात मुख्य रस्त्यांवर पाणी साचते. ही सर्व गटारे प्रवाही करण्याचा निर्णय अलिबाग नगर परिषदेने घेतला आहे. शहरातील सर्व मुख्य गटारांची सफाई सुरू केली आहे. गेली काही वर्षे गाळणे भरलेली अलिबाग शहरातील मुख्य गटारे आता पुन्हा प्रवाही होणार आहेत.
अलिबाग शहरातील पी.एन.पी. नगर, एसटी स्टँड परिसर, बाजारपेठ, ब्राह्मण आळी, रामनाथ या परिसरांतील मुख्य गटारे गेली काही वष्रे साफ न केल्यामुळे ही गटारे गाळणे भरली. त्यामुळे पावसाळ्यात पाणी रस्त्यांवर साचते. त्यामुळे अलिबाग नगर परिषदेने पावसाळ्यापूर्वी शहरातील मुख्य गटारांची सफाईची कामे सुरू केली आहेत. शहरातील स्टँडकडून रेवदंडय़ाला जाणाऱ्या रस्त्यावरील नालेसफाईचे काम पूर्ण झाले असून सध्या एसटी स्टँडसमोर नवीन नाले खोदण्याचे काम सुरू आहे. शहरातील एसटी स्टँड व पीएनपी नगर या ठिकाणी पाणी साचते. त्यामुळे सुरुवातीला या परिसरातील गटारे साफ केली जात आहेत. टप्प्याटप्प्याने सर्व गटारे साफ केली जाणार आहेत.
पावसाळ्यापूर्वी नालेसफाईची कामे केल्याने शहरात ज्या मुख्य रस्त्यांवर पाणी साचत होते. यामुळे नागरिकांना येण्या-जाण्यासही त्रास होत होता. तसेच पाणी साचल्याने जनजीवनही विस्कळीत होते, परंतु आता शहरातील सर्व नाल्यांची सफाई केल्याने पाणी जाण्यास मार्ग मोकळा होणार आहे. त्यामुळे शहरातील मुख्य रस्त्यांवर या वर्षी पाणी साचणार नाही.
शहरात जी काँक्रीटची गटारे आहेत ती गेली काही वष्रे साफ केली गेली नव्हती. त्यामुळे ती गाळाने भरली होती. त्यातून पाण्याचा निचरा होत नव्हता. ही गटारे साफ केली जात आहेत. ही गटारे साफ झाल्यामुळे ती प्रवाही होतील. त्यामुळे पावसाळ्यात रस्त्यांवर पाणी साचणार नाही, असे अलिबागचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांनी सांगितले.