विश्वास पवार

करोनाचे संकट वाढत असतानाच खासगी डॉक्टरांनीही आपली सेवा बंद केल्याने या भीतीत सर्वत्र भर पडली आहे. या पार्श्वभूमीवर वाई येथील एका हृदयविकार-मधुमेह तज्ज्ञ डॉक्टरांनी आपले रुग्णालय बंद करत थेट सातारा जिल्हा रुग्णालयात करोना रुग्णांवरील उपचारासाठी आपली सेवा रुजू केली आहे. डॉ महेश मेणबुधले असे या डॉक्टरांचे नाव. ते सध्या रुग्णांसाठी माणसातला देव ठरले आहेत.

करोनाचा संसर्ग सध्या जगभर मोठय़ा प्रमाणात वाढत आहे. बाधितांची संख्याही वाढत असल्याने जागोजागीच्या वैद्यकीय व्यवस्थेवर याचा ताण निर्माण होत आहे. रुग्णांची, संशयितांची संख्या आणि उपलब्ध व्यवस्था याचे प्रमाण सर्वत्रच व्यस्त आहे. रुग्णालये, त्यातील सुविधा, डॉक्टर, परिचारिका, अन्य कर्मचारी यांचे प्रमाणही खूपच नगण्य असल्याने उपचारावर खूपच मर्यादा येत आहेत. या पार्श्वभूमीवर डॉ. मेणबुधले हे करत असलेल्या सेवेचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

डॉ. मेणबुधले हे वाईतील प्रसिद्ध हृदयविकार आणि मधुमेह तज्ज्ञ म्हणून ओळखले जातात. तीन महिन्यांपूर्वी त्यांचे एक नवे कोरे रुग्णालय वाईत सुरू झाले होते. हे रुग्णालय बंद करून त्यांनी करोनाविरुद्धच्या लढाईत सरकारी आरोग्य व्यवस्थेशी स्वत:ला जोडून घेतले आहे. सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या या डॉक्टरांनी यापूर्वी चौदा वर्ष राज्य शासनाच्या आरोग्य सेवेत काम केलेले आहे. महाबळेश्वर तालुक्यातील दुर्गम व डोंगराळ तापोळा व कांदाटी खोऱ्यासह, कवठे (वाई) आदी ग्रामीण भागात त्यांनी उत्कृष्ट सेवा बजावली आहे. वाईच्या मिशन रुग्णालयातही त्यांनी रुग्णसेवा केली आहे. सेवाभावी वृत्ती आणि मधुमेह-हृदयरोगतज्ज्ञ म्हणून त्यांची ओळख असल्याने त्यांच्याकडे रुग्णांची सतत गर्दी असते. नुकतेच त्यांनी वाईत स्वत:चे नवेकोरे अद्ययावत रुग्णालय उभारले आहे.

करोना झालेल्यांमधील मधुमेह आणि हृदयविकार असणाऱ्या रुग्णांची विशेष काळजी घ्यावी लागते. सातारा जिल्हा रुग्णालयात दाखल होणाऱ्या या अशा रुग्णांवर सध्या डॉ. मेणबुधले हे उपचार करत आहेत. जिल्हा रुग्णालयात याबाबत तज्ज्ञ डॉक्टर नसल्याची माहिती मिळताच डॉ. मेणबुधले यांनी स्वत:चे नवेकोरे रुग्णालय बंद करून करोनाविरुद्धच्या लढाईत सरकारी आरोग्य व्यवस्थेशी स्वत:ला जोडून घेतले आहे. गेल्या १० एप्रिलपासून ते जिल्हा रुग्णालयात उपचार करत आहेत. यामुळे सध्या डॉ. मेणबुधले म्हणजे रुग्णांसाठी माणसातला देव ठरले आहेत.

करोनाला कोणीही घाबरून जाऊ  नये. करोना संसर्ग झाला म्हणजे सगळे संपले असे नाही. साताऱ्यात करोना रुग्णांना चांगली सेवा देण्याच्या उद्देशाने मी माझे नवे रुग्णालय बंद करून सातारा जिल्हा शल्य चिकित्साकडे विना मोबदला सेवा देण्यासाठी अर्ज केला. त्यांनी तत्काळ दहा एप्रिलपासून सेवा देण्यास अनुमती दिली आहे. या आणीबाणीच्या काळात सर्वानीच आपली सेवा दिली पाहिजे.

– डॉ. महेश मेणबुधले, हृदयरोग व मधुमेह औषधोपचार तज्ज्ञ