महाराष्ट्र करोनाच्या धोकादायक उंबरठ्यावर आहे. बिकट परिस्थिती आणायची नसेल तर सरकारचे निर्देश काटेकोरपणे ऐका असं आवाहन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. पुढचे काही दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत. ती भीती लक्षात घेऊच आपण संचारबंदी लागू करत आहोत असंही उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलं आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोठा निर्णय घेतला आहे. जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्य तसंच इतर आवश्यक सेवा सुरु राहतील. मात्र ते वगळून पूर्ण संचारबंदी असेल असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे.

आणखी वाचा- Coronavirus: संचारबंदी जाहीर, सीमा बंद; उद्धव ठाकरेंनी केलेल्या महत्त्वाच्या घोषणांची यादी

आजपासून जिल्ह्यांच्या सीमाही बंद करण्यात आल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. हा निर्णय नाईलाजास्तव घ्यावा लागतो आहे असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. राज्यातली सगळी प्रार्थनास्थळंही बंद करण्यात आली आहेत. फक्त पुजाऱ्यांनाच प्रवेश दिला जाईल असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. आत्ता जी परिस्थिती आहे ती नियंत्रणात आणली नाही तर जगभरात जसं करोनाचं थैमान माजलं आहे तसंच ते महाराष्ट्रातही माजेल. त्यामुळे हा निर्णय घ्यावा लागतो आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं. रविवारी ज्याप्रमाणे सगळ्यांनी जनता कर्फ्यू पाळला त्याबद्दल मी राज्याच्या जनतेला धन्यवाद देतो असंही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं.

काय काय सुरु राहणार?

जीवनावश्यक वस्तूंची दुकानं

शेती निगडीत औषधांची दुकानं सुरु राहणार

किराणाची दुकानं

मेडिकल्स

दूध आणि दुग्धजन्य पदार्थ

दवाखाने, रुग्णालयं

आणखी वाचा- टाळया किंवा थाळया वाजवून करोना विषाणू जाणार नाही – उद्धव ठाकरे

करोनाचा धोका टाळण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हा निर्णय जाहीर केला आहे. शिर्डी, औरंगाबाद येथील विमानसेवाही बंद करण्यात आली आहे. तसंच राज्याच्या सीमा आपण रविवारी बंद केल्या होत्या आता जिल्ह्यांच्या सीमाही बंद करण्यात आल्या आहेत असंही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं. महाराष्ट्रात करोनाचे एकूण ८९ रुग्ण आढळले आहेत. हा आकडा वाढूही शकतो. अशात अत्यावश्यक सेवा वगळून संपूर्ण राज्यात संचारबंदी लागू करण्यात आल्याचं उद्धव ठाकरेंनी जाहीर केलं.