करोना लढाईला तीन महिने होत आहेत, याकाळात राज्यात मोठ्या प्रमाणावर आरोग्य सुविधांची निर्मिती होत आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. पुणे जिल्हा परिषद, जिल्हा आरोग्य सोसायटी, राष्ट्रीय आरोग्य अभियान व विप्रो कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने उभारण्यात आलेल्या समर्पित कोविड आरोग्य केंद्राचा ऑनलाईन पद्धतीने हस्तांतरण सोहळा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, करोनाचा पहिला रुग्ण सापडल्यापासून ते आजची परिस्थिती यामध्ये आपण सुधारणा करत फार पुढे गेलो आहे. राज्यात प्रारंभी दोनच चाचणी केंद्र होते. आज ८० हून अधिक चाचणी केंद्रे उभारण्यात आली आहेत. लवकरच ही संख्या 100 च्या पुढे जाईल. करोना विषाणू हा संपूर्ण जगासाठी नवीन आहे. त्याच्याविरुध्द लढाई लढत असताना वेळेवर सुविधा निर्माण कराव्या लागल्या असून त्यात आपल्याला यश येत आहे, ही सकारात्मक बाब आहे. सुरुवातीला आपल्याकडे ३५० आयसोलेशन बेड होते. आजच्या घडीला आयसीयू, आयसोलेशन, ऑक्सीजनयुक्त पुरेशा प्रमाणात सर्व बेड उपलब्ध आहेत.

करोना विषाणू गुणाकाराने वाढतो, त्यामुळे आपणा सर्वांना स्वयंशिस्त पाळण्याची गरज असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. संपूर्ण जगात लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही. करोनासोबत जगताना नागरिकांना स्वयंशिस्त पाळावी लागेल. करोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी सर्व सुविधायुक्त असलेले रुग्णालय उभारणी विप्रोने केली असून त्याचा निश्चितच भविष्यात कोरोनाबाधित रुग्ण बरे करण्यासाठी उपयोग होईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.