मुंबई : काँग्रेसने रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून नवीनचंद्र बांदिवडेकर यांना उमेदवारी दिली आहे. परंतु त्यांचे ‘सनातन’ या संस्थेशी संबंध असल्याच्या चर्चेने त्यांची उमेदवारी वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. मात्र बांदिवडेकर  यांचा ‘सनातन’ संस्थेशी कोणताही संबंध नाही, असा खुलासा काँग्रेसने केला आहे.

मागील दोन लोकसभा निवडणुकीत नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे हे रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार होते.२००९ मध्ये ते निवडूनही आले होते. मात्र आता राणे काँग्रेसमधून बाहेर पडले आहेत. त्यामुळे रत्नागिरी-सिंधुदुर्गात काँग्रेसकडे सक्षम उमेदवाराची वानवा असताना, ज्यांना उमेदवारी दिली तेच वादात सापडले आहेत.

गेल्या ऑगस्टमध्ये नालासोपारा येथे स्फोटकासह वैभव राऊत या व्यक्तीला दहशतवादविरोधी पथकाने अटक केली. राऊत याचा सनातन संस्थेशी संबंध असल्याचा आरोप आहे. त्यावेळी राऊत याच्या अटकेच्या विरोधात भंडारी समाजाच्या संघटनेने सभा घेतली होती. त्या सभेला नवीनचंद्र बांदोडकर उपस्थित होते, अशी आता चर्चा सुरु झाली आहे. त्यामुळे बांदिवडेकर यांची उमेदवारी वादात सापडली आहे.

आघाडीताल काँग्रेसचा मुख्य मित्र पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी, हा उमेदवार बदला अशी थेट मागणी केली आहे. काँग्रेसने मात्र सारवासारव करीत बांदिवडेकर यांच्या उमेदवारीचे समर्थन केले आहे.

या संदर्भात काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी म्हटले आहे की, बांदिवडेकर यांचा ‘सनातन’शी कसलाही संबंध नाही, त्यांनी त्या संघटनेच्या कोणत्याही कार्यक्रमात सहभाग घेतलेला नाही. पोलीस चुकीची कारवाई करीत आहेत’, असा गैरसमज पसरवला गेला होता व समाजाच्या दबावामुळे ते चौकशीसाठी गेले होते. तेथे त्यांनी या प्रकरणी कायद्यानुसार कारवाई करण्याची मागणी केली. बांदिवडेकरांनी ‘सनातन’च्या विचारसरणीला तीव्र विरोधच केला आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात अपप्रचार करण्यात येत आहे, असे सावंत यांचे म्हणणे आहे.

योग्य निर्णय घेऊ- अशोक चव्हाण</strong>

रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार नवीनचंद्र बांदिवडेकर यांचे ‘सनातन’शी संबंध असल्याचे वृत्त काही वाहिन्यांनी दिले आहे. काँग्रेस ‘सनातन’सारख्या ेसंस्थेच्या विचारांच्या विरोधात आहे. या प्रकरणी सखोल चौकशी करून पक्ष त्यांच्या उमेदवारीबाबत योग्य तो निर्णय घेईल, असे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सांगितले.