लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर आधीच अडचणीत असलेल्या काँग्रेस पक्षासमोरील आव्हानं वाढत चालली आहे. पराभवानंतर राहुल गांधींनी अध्यक्षपद सोडण्याचा निर्धार केल्याने आधीच काँग्रेसमध्ये धावपळ सुरु आहे. त्यातच आता राज्यातील काँग्रेसचे दोन नेते भाजपाच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरु आहे. सांगली जिल्ह्यातील काँग्रेसमधील दोन बडे नेते भाजपच्या संपर्कात असल्याची माहिती मिळत आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेसचे आमदार विश्वजीत कदम आणि काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सत्यजीत देशमुख भाजपाच्या वाटेवर आहेत.

विश्वजीत कदम आणि सत्यजीत देशमुख राज्यातील पक्ष नेृतृत्त्वावर नाराज असल्याचं सांगितलं जात आहे. तसंच दोन्ही नेते भाजपा नेत्यांच्या संपर्कात असल्याचं कळत आहे. विश्वजीत कदम आणि सत्यजीत देशमुख दोघेही राजकीय पार्श्वभूमी असणाऱ्या कुटुंबातील आहेत. विश्वजीत हे काँग्रेसचे माजी मंत्री स्वर्गीय पतंगराव कदम यांचे पुत्र तर सत्यजित देशमुख हे काँग्रेसचे माजी मंत्री आणि माजी प्रदेशाध्यक्ष स्वर्गीय शिवाजीराव देशमुख यांचे पुत्र आहेत.

पावसाळी अधिवेशनाआधी दोन्ही नेते भाजपात प्रवेश करण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीत पक्षाची दयनीय अवस्था झाल्यानेच दोन्ही नेते पक्षांतर करणार असल्याचं बोललं जात आहे.

भाजपात प्रवेश करणार असल्याचं वृत्त खोटं – विश्वजीत कदम
यादरम्यान विश्वजीत कदम यांनी आपण भाजपात प्रवेश करणार असल्याचं वृत्त खोटं असल्याचं सांगितलं आहे. ‘मी भाजपात जाणार असल्याचं वृत्त चुकीचं आहे. भविष्यातही मी काँग्रेसमध्ये राहणार आहे,’ असं विश्वजीत कदम यांनी सांगितलं आहे.

सत्यजीत देशमुख यांनीदेखील हे वृत्त निराधार असल्याचं म्हटलं आहे. मी काँग्रेससोबत आहे आणि काँग्रेससोबतच राहणार. कोणीतरी जाणुनबुजून अशा अफवा पसरवत आहे असा आरोप त्यांनी केल आहे.