काँग्रेस हा भ्रष्टाचारी व काळे धन गोळा करणाऱ्यांचा पक्ष आहे असे सांगतानाच पंडित जवाहरलाल नेहरूंपासून सोनिया गांधी यांच्यापर्यंत नेहरू-गांधी कुटुंबाने देश लुटल्याचा आरोप योगगुरू बाबा रामदेव यांनी आज शिर्डी येथे पत्रकारांशी बोलताना केला. लोकसभेच्या येत्या निवडणुकीत काँग्रेसला जागांची शंभरीही गाठता येणार नाही, असे भाकीत त्यांनी केले.
पतंजली योग आश्रमाच्या वतीने राज्यातील महिलांचे सशक्तीकरण महासंमेलन आज शिर्डी येथे आयोजित करण्यात आले होते. या संमेलनापूर्वी बाबा रामदेव यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पंतप्रधानपदासाठी अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले असले तरी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी हेच या पदासाठी लायक आहेत असा निर्वाळा त्यांनी दिला. ते म्हणाले, मोदी यांच्यावर आजपर्यंत भ्रष्टाचाराचा डाग लागलेला नाही. एकीकडे हा निष्कलंकपणा व दुसरीकडे विकासाचा मोठा आवाका याच गोष्टी मोदी यांना देशभर समर्थन मिळण्यास पुरेशा आहेत. येत्या निवडणुकीत केंद्रात भाजपची सत्ता यावी अशीच आपली इच्छा असून त्यासाठी प्रयत्नशीलही आहे. भाजपला देशभरात ३०० जागा मिळाव्यात या दृष्टीने मोर्चेबांधणी करण्यात आली आहे, असे ते म्हणाले. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार हेही मोदी यांच्या नावाला पाठिंबा देतील, असा दावाही बाबा रामदेव यांनी केला.
गांधी-नेहरू कुटुंबीयांवर बाबा रामदेव यांनी या वेळी जोरदार टीका केली. परदेशात वैद्यकीय उपचार घेण्याच्या नावाखाली त्या एजंट म्हणून कार्यरत असल्याचा आरोपही त्यांनी केला. राहुल गांधी यांच्याकडे विकासाचा कोणताही अजेंडा नाही, त्यांच्याकडून कुठल्या गोष्टींची अपेक्षा करणेच गैर आहे, असे ते म्हणाले. देशात तिसऱ्या आघाडीची चर्चा आता रंगू लागली असली तरी हे दिवास्वप्नच ठरेल अशी खिल्ली त्यांनी उडवली. महाराष्ट्रामध्ये गुंडांचे राज्य आहे. मराठी जनता माझ्यावर प्रेम करते, त्यामुळे येत्या निवडणुकांमध्ये मी महाराष्ट्राकडे विशेष लक्ष देणार आहे, असे बाब रामदेव यांनी सांगितले.