मोहन अटाळकर

पश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्य़ांत गेल्या काही दिवसांमध्ये करोनाचा मोठा उद्रेक दिसून आला असून अचानकपणे झपाटय़ाने करोनाबाधितांच्या संख्येत झालेली वाढ ही सर्वासाठी आश्चर्यकारक ठरली आहे. गेल्या दोन आठवडय़ांमध्ये रुग्णांच्या संख्येत तब्बल दहा हजारांची भर पडली आहे. हे धोक्याचे संके त मानले जात आहेत. करोना हद्दपार झालाय, या भ्रमात वावरणाऱ्या नागरिकांना करोनाच्या या दुसऱ्या लाटेने मोठा धक्का दिला आहे. आता नव्याने संचारबंदी, टाळेबंदीसारख्या उपाययोजना राबविण्यास सुरुवात झाली आहे.

अमरावती विभागातील अकोला, अमरावती आणि यवतमाळ या तीन जिल्ह्य़ांमध्ये करोना झपाटय़ाने पसरला आहे. विभागात करोनाबाधितांची एकू ण संख्या ही ८३ हजारांच्या वर पोहोचली आहे. गेल्या पंधरा दिवसांमध्ये तब्बल दहा हजार रुग्ण वाढले आहेत. आतापर्यंत १ हजार ६०५ जणांचा करोनाने बळी घेतला आहे. सद्य:स्थितीत सुमारे ८ हजार रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

एकटय़ा अमरावती जिल्ह्य़ात करोनाने आतापर्यंत ४६३ जणांचा मृत्यू झाला आहे. जानेवारी ते फेब्रुवारी या दोनच महिन्यांत ६७ जणांचा मृत्यू झाला आहे. आकडेवारीनुसार २९ जानेवारी ते ४ फेब्रुवारीपर्यंत मृत्यूचा दर हा १ होता. फेब्रुवारी ५ ते ११ दरम्यान कमी होऊन तो ०.८५ वर आला होता. त्यानंतर फेब्रुवारी १२ ते १८ पर्यंत मृत्युदर १.६२ ने अचानक वाढला. तर १२ फेब्रुवारी पासून दररोज ३ ते ६ लोकांचा मृत्यू होत असल्याचे दिसून आले आहे.

कोव्हिड चाचणी करण्यासाठी लोक उशिराने येऊ लागले, त्यामुळे मृत्युदर वाढला. वयस्कर आणि पूर्वीचे आजार असणारे ज्यांना रक्तदाब, मधुमेह, किडनीच्या व्याधीने ग्रस्त असणाऱ्यांना मृत्यूची शक्यता अधिक असते. यापूर्वी कुटुंबातील एकदोघेच करोनाबाधित व्हायचे, पण आता एका कुटुंबातले बहुतांश लोक करोनाबाधित होत आहेत, हे वैद्यकतज्ज्ञांचे निरीक्षण आहे.

राज्याच्या आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, अमरावती जिल्ह्य़ात एकूण तपासण्यांपैकी ४८ टक्के  लोकांना करोनाचा संसर्ग झाला आहे. अमरावती जिल्ह्य़ातील अचलपूर तालुका आणि अमरावती महापालिका क्षेत्रात करोनाबाधितांची संख्या सर्वात जास्त आढळून आली आहे.

लोक मुखपट्टीचा वापर करत नाहीत, प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष झाले, गर्दीवर नियंत्रणासाठी योग्य खबरदारी घेतली गेली नाही, ग्रामपंचायत निवडणूक, नेत्यांचे दौरे, प्रचार, आंदोलने यामध्ये मोठय़ा प्रमाणावर गर्दी झाली, सरकारने घाललेले निर्बंध नागरिकांनी पाळले नाहीत, ही कारणे आता करोना संसर्ग वाढण्यामागे सांगितली जात आहेत. पण, इतर ठिकाणीही अशीच अवस्था असताना पश्चिम विदर्भातील तीन जिल्ह्य़ांमध्ये परिस्थिती आवाक्याबाहेर का गेली, याचे कोडे प्रशासनाला आहे.

दुसरीकडे, करोनातून बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण लक्षणीय घटले आहे. रुग्ण बरे होण्याचा दर विदर्भात सर्वातकमी ८२.९ टक्के  अमरावती जिल्ह्य़ाचा आहे. अकोला जिल्ह्याचा दर  ८८.१ टक्के  आहे. वाढती रुग्णसंख्या आणि बरे होण्याचे प्रमाण कमी असल्याने परिस्थिती चिंताजनक होत आहे. सप्टेंबरच्या तुलनेत जानेवारी महिन्यात जवळपास सर्वत्रच करोना संसर्गाचा वेग मंदावला होता. मात्र, फेब्रुवारीच्या सुरुवातीलाच अमरावती, अकोला आणि यवतमाळ  जिल्ह्य़ात कोविड रुग्णांच्या संख्येत झपाटय़ाने वाढ होऊ लागली.

गेल्या आठवडाभरापासून करोनाने पश्चिम विदर्भातील अमरावती, यवतमाळ आणि अकोला जिल्ह्य़ात कहर केला. दररोज प्राप्त अहवालाच्या ५० टक्क्यांच्या जवळपास रुग्णांचे अहवाल सकारात्मक येऊ लागल्याने चिंता वाढली. त्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही कमी झाले. विदर्भात सर्वाधिक २.८ टक्के  इतका मृत्युदर अकोला आणि यवतमाळ जिल्ह्य़ाचा आहे. अमरावती जिल्ह्य़ाचा मृत्युदर १.५ टक्के , वाशिम जिल्ह्य़ाचा २.१ तर बुलढाणा जिल्ह्य़ाचा दर हा १.६ टक्के  आहे.

कारणे काय?

पश्चिम विदर्भात झपाटय़ाने करोना रुग्णसंख्येत वाढ होण्यामागे काय कारणे आहेत, याचा याविषयी आता खल सुरू झाला आहे. मध्यंतरीच्या काळात निर्बंध शिथिल झाल्यानंतर करोना प्रतिबंधक नियमांच्या पालनाकडे झालेले सार्वत्रिक दुर्लक्ष त्यासाठी कारणीभूत मानले गेले आहे. बाजारपेठांमध्ये गर्दी होऊ लागली, लोक मुखपट्टीविना फिरू लागले आणि सोबतच लक्षणेविरहित करोनाबाधितांचा गर्दीतला सहभाग हा अधिक धोक्याचा ठरला. गृह विलगीकरणातील करोनाबाधितांनीदेखील काळजी न घेतल्याने करोनाचा संसर्ग फैलावण्यास वाव मिळाला, विवाह समारंभांमध्ये गर्दी वाढली. नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कारवाईच थांबली आणि करोनाची लस आली आहे, आता घाबरण्याचे कारण नाही, हा भ्रम निर्माण झाला, असे निरीक्षण नोंदविले गेले आहे.

करोनाचा वाढलेला प्रादुर्भाव चिंताजनक आहे. लवकरात लवकर ही परिस्थिती आटोक्यात येईल, या दृष्टीने नियोजन करण्यात येत आहे. करोनावर मात करण्यासाठी आता नव्याने निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मुखपट्टीचा वापर, सामाजिक अंतराचे पालन आणि हातांची नियमित स्वच्छता या त्रिसूत्रीचा अवलंब करून करोनाला हद्दपार करण्यासाठी सर्वानी पुढाकार घेण्याची गरज आहे.

– अ‍ॅड. यशोमती ठाकूर, महिला व बालविकासमंत्री तथा पालकमंत्री