कोकणातील तिन्ही जिल्ह्यांत रुग्णांचे प्रमाण अधिक

कोल्हापूर / सांगली / कराड : राज्यात सर्वत्र करोना संसर्गदर घटत असताना पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली आणि कोल्हापूर तर रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग या कोकणातील जिल्ह्यांचा संसर्गदर चिंताजनक आहे.

सातारा, सांगली आणि कोल्हापूर या तिन्ही जिल्ह्यांत शहरी भागांपेक्षा ग्रामीण भागात रुग्ण सापडण्याचे प्रमाण मोठे आहे. यामागे निर्बंधांचे काटेकोर पालन करण्यातील हलगर्जीपणा हे कारण स्पष्ट होत असताना प्रशासन मात्र वाढीव चाचण्या आणि रुग्णशोधाचे कारण पुढे करीत आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील करोनाचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत नाही. अजूनही दररोज सरासरी दीड हजारावर रुग्ण आढळत आहेत. जिल्ह्यातील संसर्गाचा दर मेमध्ये १५ टक्क्यांवर होता. सध्या तो काहीसा खालावला आहे, परंतु तो ११ टक्क्यांच्या घरात असल्याने चिंता वाढली आहे. ग्रामीण भागातील रुग्णांचा, त्याच्या संपर्कात आलेल्या नागरिकांचा शोध घेण्यात यंत्रणा कमी पडत असल्याने संसर्गाचा दर चिंताजनक असल्याचे सांगण्यात येते.

सांगली जिल्ह्यात मे महिन्यात ३१ टक्क्यावर गेलेला रुग्णवाढीचा आलेख गेल्या दहा दिवसांमध्ये १० टक्के आहे. रोज सहा ते सात हजार करोना चाचण्या केल्यानंतर निष्पन्न झालेल्या रुग्णांची सहवासिता शोधण्यात टाळाटाळ होत असल्याचे समजते. सौम्य किंवा अजिबात लक्षणे नसणारे रुग्ण वाहक असून ते फिरत आहेत. सातारा जिल्ह्यात मे महिन्यात ३६ टक्क्यांवर गेलेला संसर्ग दर सध्या ९.७५ टक्क्यांवर आला आहे. या जिल्ह्यातही संसर्गाचा हा दर शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात मोठा आहे. जिल्ह्यातील या वाढत्या संसर्गास निर्बंधाच्या काटेकोर अंमलबजावणीतील ढिलाई जास्त कारणीभूत असल्याचे सांगण्यात येते. निर्बंधांकडे दुर्लक्ष केले जात असल्याने अनेक गावांत कुटुंबेच्या कुटुंबे करोनाबाधित आढळत आहेत.

सातारा जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरूद्ध आठल्ये म्हणाले की, लोकांमध्ये पहिल्या लाटेइतके गांभीर्य दुसऱ्या लाटेत राहिले नाही. गृहविलगीकरणातील बाधित मोकाट फिरत होते. त्यामुळे प्रादुर्भाव वाढला. परंतु कठोर टाळेबंदी, गृहविलगीकरणाऐवजी संस्थात्मक विलगीकरणामुळे आता रुग्ण निष्पन्नता दर दहा टक्क्यांपर्यंत खाली आला आहे.

कोल्हापूरमध्ये करोनाची दुसरी लाट तुलनेने उशीरा सुरू झाली. त्यामुळे येथे संसर्गाचा प्रादुर्भाव कमी होण्यासाठी आणखी किमान दोन आठवडे लागण्याची शक्यता आहे. नाशिकमध्ये बाधितांचे प्रमाण आता ७.१२ टक्के झाले आहे. नाशिकचे पुण्यासारखे झाले आहे. नाशिक शहरामध्ये प्रादुर्भाव कमी झाला आहे. परंतु ग्रामीण भागात मात्र वाढत आहे. साताऱ्यात मात्र अजूनही चिंताजनक स्थिती आहे. दुसरी लाट सुरू झाल्यापासून साताऱ्यात रुग्ण वाढत होते. तेथील रुग्णवाढ कमी झालेली नाही. सातारा ग्रामीण भाग असूनही तेथील प्रादुर्भाव कमी का होत नाही, याची ठोस कारणे अद्याप स्पष्ट झालेली नाहीत, असे राज्याच्या साथरोग सर्वेक्षण विभागाचे प्रमुख डॉ. प्रदीप आवटे यांनी सांगितले.

 

बाधितांचे प्रमाण अधिक असलेल्या जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या कोणत्या भागात वाढत आहे याचे निदान करण्याच्या आणि त्या भागांत सर्वांच्या प्रतिजन चाचण्या करण्याच्या सूचना दिल्या आहेत. जेणेकरून संसर्गाला वेळीच रोखता येईल. रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेण्यासह ठिकठिकाणी चाचण्या उपलब्ध करण्यावर भर दिला आहे.   – डॉ. प्रदीप आवटे, प्रमुख, साथरोग सर्वेक्षण विभाग, महाराष्ट्र 

 

पुणे विभागात सक्रिय रुग्णसंख्या ५१,६४७ आहे. मृत्यूचे प्रमाण २.०२ टक्के  आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.७९ टक्के  आहे. पुणे, सोलापूर वगळता सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या जास्त असली, तरी बरे होणाऱ्यांची संख्याही जास्त आहे. चाचण्या, रुग्णांचे संपर्कशोध वाढवण्यात आल्या आहेत.   – सौरभ राव, विभागीय आयुक्त, पुणे विभाग