News Flash

चाकरमान्यांसाठी खुशखबर! एसटीने कोकणात जाणाऱ्यांना ई-पासची गरज नाही, क्वारंटाइन कालावधी १० दिवसांवर

१२ तारखेनंतर कोकणात जाणाऱ्यांना स्वॅब टेस्ट अनिवार्य

गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी होम क्वारंटाइन होण्याचा कालावधी १४ वरुन १० दिवसांवर आणण्यात आला आहे. सोबतच एसटीने प्रवास करताना ई-पासची गरज लागणार नाही. मात्र खासगी वाहनाने प्रवास करताना ई-पास अनिवार्य असणार आहे. कोकणात जाऊ इच्छिणाऱ्या चाकरमान्यांना १२ तारखेपूर्वी कोकणात पोहोचावं लागणार आहे. ज्यांना १२ तारखेनंतर कोकणात जायचं आहे त्यांना स्वॅब टेस्ट करुन तो निगेटिव्ह असल्याचा रिपोर्ट प्रशासनाकडे सादर करावा लागणार आहे. त्यानंतर त्यांना परवानगी दिली जाईल. राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी पत्रकार परिषदेत बोलताना ही माहिती दिली आहे.

अनिल परब यांनी दिलेल्या माहितीनुसार, “कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना १२ तारखेपूर्वी कोकणात पोहोचायचं आहे. क्वारंटाइन होण्याचा कालावधी हा १० दिवसांचा करण्यात आला आहे. जे कोकणात जातील ते सगळे होम क्वारंटाइन होतील. अनेकांनी आम्हाला १२ तारखेनंतर कोकणात जायचं असल्याची विनंती केली आहे. त्यांच्यासाठी नवे नियम असून १२ तारखेनंतर जाणाऱ्यांना जाण्याच्या ४८ तास आधी स्वॅब टेस्ट करुन घ्यावी लागणार आहे. रिपोर्ट निगेटिव्ह असेल तरच त्यांना परवानगी देता येणार आहे. हा रिपोर्ट प्रशासनाकडे दिल्यानंतर जाण्याची परवानगी दिली जाईल”.

“कोकणात जाणाऱ्यांसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाने एसटी सेवा देण्याची तयारी सुरु केली आहे. आज संध्याकाळपासून बुकिंग सुरु होणार आहे. एसटीने जे लोक जाणार आहेत त्यांना ई-पासची गरज नाही. एसटी हाच तुमचा ई-पास आहे. पोर्टलमध्ये नोंद असल्याने प्रवाशांची सर्व माहिती आमच्याकडे उपलब्ध असणार आहे,” असं अनिल परब यांनी यावेळी सांगितलं.

“दरम्यान एसटी २२ लोकांसाठी असणार आहे. २२ जणांनी मिळून ग्रुप बुकिंग केलं तर गावात थेट सोडण्याची व्यवस्था एसटी करेल. यामुळे मुंबईतून ते थेट आपल्या गावात प्रवास करता येणार आहे. एसटी रस्त्यात कुठेही थांबणार नाही. प्रवाशांना जेवण घरुनच घ्यावं लागणार आहे,” असंही अनिल परब यांनी सांगितलं आहे. खासगी वाहनाने प्रवास करताना मात्र ई-पास अनिवार्य असणार आहे.

…तर खासगी चालकांवर कारवाई
“खासगी बसेसकडून लूटमार सुरु असल्याच्या अनेक तक्रारी येत आहेत. नियमाप्रमाणे खासगी बस चालकांना एसटीपेक्षा दीडपट पैसे घेण्याचा अधिकार आहे. त्याच्याव्यतिरिक्त कोणी जास्त पैसे देऊ नये. तशी मागणी केल्यास पैसे देऊन नका आणि तक्रार केली तर कारवाई करु. कोकणात लोक जातील आणि आपला गणेशोत्सव साजरा करतील. यासाठी सरकारने हे धोरण तयार केलं आहे. पण लोकांनी कोकणात गेल्यावर गर्दी करु नये,” असं आवाहन अनिल परब यांनी केलं आहे.

एसटी कर्मचाऱ्यांसाठी ५५० कोटी
“गेले काही महिने एसटी कर्मचाऱ्यांना पगार देऊ शकलो नाही. पण मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सूचनेनुसार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. परिवहन मंडळाने एसटी कामगारांच्या पगारासाठी ५५० कोटी मंजूर केले आहेत. लवकरच कर्मचाऱ्यांचा पगार होईल,” असं आश्वासन अनिल परब यांनी दिलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 4, 2020 3:42 pm

Web Title: coronavirus anil parab on konkan st e pass home quarantine ganeshotsav sgy 87
टॅग : Coronavirus,Ganeshotsav
Next Stories
1 मुंबईवर टीका करणाऱ्या अमृता फडणवीसांना रेणुका शहाणेंचा सणसणीत टोला
2 सुशांत सिंह आत्महत्या : “…हे पाहून वाईट वाटतंय”; काँग्रेसनं व्यक्त केली नाराजी
3 मुंबई, ठाणे, रायगड जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट; अतिवृष्टीची शक्यता
Just Now!
X