जगभरामध्ये करोनामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहेत. करोनाच्या संसर्ग झाल्याने जगभरामध्ये लाखो लोकं मरण पावली आहेत. असं असतानाच करोना विषाणूचा संसर्ग मानवाला कसा झाला याबद्दलचे गूढ अद्याप कायम आहे. चीनमधील ज्या वुहानमधून करोना जगभरात पसरत गेला त्या वुहानमधील वटवाघळांमुळे करोनाचा संसर्ग मानवाला झाल्याचा दावा केला जात आहे. तर दुसरीकडे हा विषाणू चीनने प्रयोगशाळेमध्ये तयार केल्याचा आरोपही काही देशांनी केला आहे. असं असतानाच महाराष्ट्रामधील एक तरुण डॉक्टर मात्र करोनासंदर्भातील जनजागृती करताना दिसत आहे. डॉक्टर महेश गायकवाड असं या तरुणाचे नाव असून करोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व सामान्यांमध्ये वटवाघळांसंदर्भात निर्माण झालेली भीती दूर करण्याचे काम महेश करत आहे. “चीनमध्ये ज्या वटवाघळांच्या माध्यमातून मानवाला करोनाचा संसर्ग झाल्याचे सांगण्यात येत आहे त्या प्रजातीची वटवाघळं भारतामध्ये अढळत नाहीत,” अशा शब्दांमध्ये महेश त्याला वटवाघळांसंदर्भात कॉल करणाऱ्यांना समजावून सांगतो. मानवामुळे करोनाचा प्रादुर्भाव होत आहे वटवाघळांमुळे नाही, असा दावा महेश करतो. यासंदर्भातील वृत्त ‘द बेटर इंडिया’ या वेबसाईटने दिलं आहे.

करोनाची साथ आल्यापासून महेशला वटवाघळांसंदर्भातील कॉल येण्याची संख्या वाढली आहे. मागील दोन आठवड्यांमध्ये महेशला दीडशेहून अधिक जणांनी कॉल करुन वटवाघळांसंदर्भातील प्रश्न विचारले आहेत. बरं हे कॉल महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागांमधून येत आहेत. अगदी अहमदनगर, सिन्नर, चंद्रपूर, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, मंगळवेढा या भागांमधून आतापर्यंत महेशला सर्वाधिक कॉल आले आहेत. घराजवळच्या एखाद्या झाडावर किंवा इमारतीमधील एखाद्या कोपऱ्यात असणाऱ्या वटवाघळांसंदर्भात काय करता येईल याबद्दल महेशकडे चौकशी होते. अशावेळेस महेश चीनमध्ये करोनाच्या विषाणूचा संसर्ग ज्या वटवाघळांच्या माध्यमातून झाल्याचा संक्षय व्यक्त केला जात आहे ती प्रजाती भारतात अढळत नाही असं समोरच्या व्यक्तीला समजावून सांगतो. “वटवाघुळं करोनाचा पसरतव नाहीत माणसं पसरवतात,” असंही तो समोरच्याला फोन ठेवताना आवर्जून सांगतो.

इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (आयसीएमआर) केलेल्या एका अभ्यासामध्ये भारतामधील दोन वटवाघुळांच्या प्रजातीमध्ये कोव्हीड विषाणू अढळून आल्याचे वृत्तसमोर आल्यानंतर वाटवाघळांसंदर्भात प्रश्न विचारणाऱ्या कॉलची संख्या वाटल्याचे निरिक्षण महेश नोंदवतो. आयसीएमआरच्या संशोधनानुसार केरळ, हिमाचल प्रदेश, तामिळनाडू आणि पुडुचेरीच्या काही भागांमध्ये अढळणाऱ्या वटवाघळांच्या दोन प्रजातींमध्ये बॅट कोव्हीड (BtCoV) विषाणू आढळून आला. मात्र ‘बॅट कोव्हीड आणि जगभरातमध्ये फैलाव होत असणारा करोना विषाणू म्हणजेच सार्क कोव्हीड-२ या विषाणूशी काहीही संबंध नाही,’ असं या अहवालामध्ये ज्या स्पष्टपणे नमूद केलं आहे. असं असलं तरी या वृत्तानंतर वटवाघळासंदर्भात भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे. “या वेळी या संशोधनासंदर्भातील तपशील सार्वजनिक करण्याची गरज नव्हती. यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे,” असं मत महेशने व्यक्त केलं.

काही आठवड्यांपूर्वी राजस्थानमध्ये १५० वटवाघुळांना मारल्याचे बातमी समोर आली होती. करोनामुळे लोकं प्रचंड घाबरली असून ते वटवाघळांवर विषप्रयोग करणे, गुहा बंद करणे, झाडे तोडणे असे वेगवेगळे उपाय वटवाघळांना पळवून लावण्यासाठी करत असल्याचे आपल्याला वेगवेगळ्या माध्यमांमधून समजलं असल्याचे महेश सांगतात.

मागील आठ वर्षांपासून महेश वटवाघळांवर संशोधन करत असून त्याने अत्तापर्यंत महाराष्ट्रात वटवाघळांच्या सहा नव्या प्रजाती शोधून काढल्या आहेत. मूळचा बारामतीचा असणारा ४० वर्षीय महेश महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी भटकला आहे. त्याने आतापर्यंत सात हजारहून अधिक वटवाघळांना हाताळलं आहे. महेशने ‘आपली वटवाघळं’ आणि ‘तिमीरदूत’ ही वटवाघळांसंदर्भातील दोन पुस्तकेही लिहिली आहेत. वटवाघळांचे नैसर्गिक आधिवास धोक्यात आले आहेत असं महेश सांगतो. वटवाघळांना मानवाने एकटं सोडलं तर मानवाचा आणि त्यांच्या कमीत कमी संपर्क येईल आणि विषाणूंचा फैलाव होणार नाही असंही महेश म्हणतो.