News Flash

उद्धव ठाकरेंच्या कामकाजावर पहिल्यांदाच राज ठाकरेंची प्रतिक्रिया, म्हणाले….

"आपण एक लक्षात घेतलं पाहिजे ते म्हणजे याआधी अशी परिस्थिती कोणासमोर आली नव्हती"

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आता कठोर निर्णय घेतले पाहिजेत असं मत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केलं आहे. राज्य सरकारच्या कामकाजावर बोलताना सगळं काही बरोबर चाललं आहे असं दिसत नसल्याचंही राज ठाकरेंनी सांगितलं आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राज ठाकरे बोलत होते. यावेळी त्यांना उद्धव ठाकरेंच्या कार्यपद्दतीसंबंधी विचारण्यात आलं.

राज ठाकरे यांनी यावेळी सांगितलं की, “सुरुवातीच्या वेळी काही गोष्टी मी त्यांना सुचवल्या. त्यातल्या काही गोष्टी झाल्या तर काही झाल्या नाहीत. नंतर काही गोष्टी करायला घेतल्या पण उशीर झाला होता. आपण एक लक्षात घेतलं पाहिजे ते म्हणजे याआधी अशी परिस्थिती कोणासमोर आली नव्हती. त्यामुळे राज्य किंवा केंद्र सरकारला काय करायचं हे कळत नव्हतं. पण आता ज्या गोष्टी झाल्या पाहिजेत त्या होताना दिसत नाही. आपण नोकरशाहीवर किती अवलंबून राहत आहोत याचा विचार झाला पाहिजे”.

“एक अधिकारी वेगळं सांगत आहे. दुसरा वेगळं सांगतोय. मी काही मंत्र्यांशी बोललो तेव्हा ते म्हणतात तुम्हीच उद्धव ठाकरेंशी बोला, मुख्य सचिवांशी बोला. हे काही बरोबर चाललं आहे असं दिसत नाही. सगळे बसून निर्णय घेत आहेत आणि नंतर लोकांपुढे येत आहेत असं मला तरी दिसत नाहीये. असं भासवण्याचा प्रयत्न होत आहे, पण तसं दिसत नाही,” असंही राज ठाकरे यांनी यावेळी सांगितलं.

“रमजानला रस्ते भरले होते, असं कसं करुन चालेल. त्यांच्या सणांसाठी लोक रस्त्यात येणार आणि आपले लोक आले की त्यांना बांबू मारणार हे काही बरोबर नाही. ज्यावेळी असं संकट येतं तेव्हा सर्वांना समान वागणूक दिली पाहिजे. आंबेडकर जयंतीला आमच्या बांधवांनी घरी थांबून जयंती साजरी केली. मग अशा गोष्टी का होत आहेत ? कठोर निर्णय घेणं गरजेचं आहे,” असं यावेळी राज ठाकरेंनी सांगितलं.

“महाराष्ट्रात काय घडत आहे याचा अंदाज घेणं आणि लोकांना सांगणं गरजेचं आहे. दोन तास काय दुकानं उघडी ठेवताय, पूर्ण दिवस ठेवा ना. झुंबड झाली की नियमांचं पालन होत नाही म्हणतात. हा कुठला थिल्लरपणा आहे. सुरुवातीला काही गोष्टी बऱ्य़ा वाटल्या पण आता ठाम निर्णय घेणं गरजेचं आहे. लॉकडाउन कधी आणि कसं काढणार हे लोकांना सांगणं गरजेचं आहे. प्रत्येक वेळी मुख्यमंत्र्यांनी यावं असंच काही नाही इतरजण येऊनही सांगू शकतात,” असं राज ठाकरेंनी यावेळी सांगितलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 1, 2020 6:55 pm

Web Title: coronavirus lockdown mns president raj thackeray on shivsena cm uddhav thackeray sgy 87
टॅग : Coronavirus
Next Stories
1 निवारागृहातील मजुरांच्या हाती कामगार दिनी वही-पेन
2 देशाचं अर्थचक्र रुळावर आणण्यासाठी मोदी सरकारनं प्रयत्न करावेत, आम्ही साथ देऊ : शरद पवार
3 झोपडपट्टीवासीयांना मोफत घरं, या बाळासाहेबांच्या घोषणेनंतर मराठीची घसरण सुरू : राज ठाकरे
Just Now!
X