04 March 2021

News Flash

Respect Mr. CM! काश्मीरपासून दक्षिणात्य राज्यांपर्यंत… देशभरातून होतंय उद्धव यांचं कौतुक

अनेक सेलिब्रिटी आणि नेत्यांनी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाचं कौतुक केलं आहे

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे. (संग्रहित छायाचित्र)

करोनाचा फैलाव वेगाने होत असल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यातील स्थिती ज्या पद्धतीने हाताळत आहेत त्याबद्दल त्यांचे सर्व स्तरांमधून कौतुक होताना दिसत आहे. महाराष्ट्रात, त्यातही मुंबईत करोनाबाधितांची संख्या अधिक असतानाही उद्धव ठाकरे ज्या पद्धतीने स्थिती हाताळत आहेत त्याबद्दल विविध समाजमाध्यमांमार्फत त्यांच्यावर कौतुकाचा वर्षांव होत आहे. ४ एप्रिल रोजी उद्धव यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधताना धार्मिक तेढ निर्माण करण्यासाठी खोटे आणि चुकीचे, गैरसमज पसरवणारे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्यांची गय केली जाणार नाही असा थेट इशाराच दिला आहे. उद्धव यांच्या या भूमिकेचे सर्वांनी कौतुक केलं आहे. अनेक सेलिब्रिटींनीही उद्धव यांच्या या भूमिकेचे स्वागत केलं असून ज्या पद्धतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री परिस्थिती हाताळत आहेत त्याचा आम्हाला अभिमान तर आहेच पण त्यांच्या या नेतृत्वाचा आदारही आहे असं अनेकांनी म्हटलं आहे.

करोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात असून अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वारंवार फेसबुकवरुन संवाद साधत लोकांना संयम राखण्याचं आवाहन करत महत्त्वाचे निर्णय आणि सूचनांची माहिती देत आहेत. उद्धव ठाकरे ज्या पद्धतीने परिस्थिती हाताळत आहे त्याचं सर्वच स्तरातून कौतुक केलं जात आहे. फक्त सर्वसामान्य नाही तर सेलिब्रेटीही जाहीरपणे उद्धव ठाकरे यांचं कौतुक करत आहेत. प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनीही ट्विटरवरुन उद्धव ठाकरे कौतुकास पात्र असल्याचं सांगत त्यांना सलाम केला आहे. “उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वात महाराष्ट्र सरकार ज्या पद्धतीने करोना व्हायरसंबंधी स्पष्ट निर्देश देत परिस्थिती हाताळत आहे ते कौतुकास पात्र आहे. माझा सलाम,” असं जावेद अख्तर यांनी म्हटलं आहे.

जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी ठाकरे यांचे ट्वीटद्वारे कौतुक केले आहे. त्यांनी उद्धव ठाकरे उत्तम काम करत असल्याचे ट्विट केलं आहे.

 

अभिनेत्री स्वरा भास्कर हिने सुद्धा उद्धव ठाकरेंचं कौतुक केलं आहे. “आम्ही महाराष्ट्रातील जनतेला या संकटामधून वाचवू. पण कोणी नोटांना थुंकी लावली जात असल्यासारखी चुकीची माहिती पसरवण्यासाठी खोटी माहिती आणि व्हिडिओ फॉर्वर्ड करत असेल तर माझा कायदा त्यांना सोडणार नाही हे लक्षात घ्यावं. अशा लोकांची गय केली जाणार नाही. हे व्हिडिओ मजा म्हणून केले असले तरी कोणालाच सोडलं जाणार नाही,” असा इशारा उद्धव यांनी आपल्या भाषणात दिला होता. यावर प्रतिक्रिया देताना स्वराने “उद्धव ठाकरे खरोखरच एकाद्या नेत्याला शोभेल असचं बोलले. त्यांचा आदर आहे. त्यांना सलाम,” असं ट्विट केलं होतं.

संगीतकार सलीम मर्चेंटनेही उद्धव ठाकरे यांचे ट्विटवरुन आभार मानले आहेत. “करोनाविरुद्धच्या लढ्यामध्ये तुम्ही करत असलेल्या मार्गदर्शनासाठी, नेतृत्वासाठी आणि प्रयत्नांसाठी तुम्हाला धन्यवाद देऊ इच्छितो. सध्या आपले या जीवघेण्या विषाणूशी युद्धच सुरु आहे या मताशी मी सहमत आहे. तसेच पाच लाख कामगारांची काळजी घेण्यासाठी धन्यवाद,” असं ट्विट सलीमने केलं आहे.

तर तुमच्याबद्दल खूप आदर वाटतो उद्धव ठाकरे असं ट्विट ‘थप्पड’ चित्रपटाचे दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांनी केलं आहे.

गायक, संगितकार, गितकार असणाऱ्या सिद्धार्थ महादेवन यानेही उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचं कौतुक केलं आहे. “या संकटाच्या काळात माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजी आणि माझा मित्र आदित्य ठाकरे ज्याप्रकारे राज्यातील परिस्थिती हाताळत आहेत त्याचा खूप अभिमान वाटतो. आम्ही नशिबवान आहेत की या गंभीर काळात तुमचे नेतृत्व लाभले आहे. तुम्ही तुमचे चांगले काम सुरु ठेवा. आम्ही घरीच थांबून तुम्हाला सहकार्य करतो,” असं सिद्धार्थ म्हणाला आहे.

तर अभिनेत्री मिनू माथूर हिने, “आपल्या राज्याची सुरक्षा आणि प्रशासनाला प्राधान्य दिल्याबद्दल उद्धव ठाकरे यांचे आभार,” असं ट्विट करत मुख्यमंत्र्यांचे कौतुक केलं आहे.

सध्या ज्या आवाजाची गरज आहे असा आवाज म्हणजे उद्धव ठाकरे अशा शब्दांमध्ये अभिनेत्री संध्या मृदुल यांनी उद्धव यांचे कौतुक केले आहे.

याशिवाय अनेक राज्यांमधील मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरे यांच्या कार्याचे कौतुक केलं आहे. द्रमुकचे अध्यक्ष एम. के. स्टॅलिन, चंद्रबाबू नायडू, तामिळनाडूचे मुख्यमंत्री पलानीस्वामी, दाक्षिणात्य सुपरस्टार पवन कल्याण, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदरसिंग अशा अनेकांनी ट्विटवरुन जाहीरपणे उद्धव ठाकरे आणि राज्यातील सरकारचे कौतुक केलं आहे. वेगवगेळ्या राज्यांमधील कामगार लॉकडाउनमुळे महाराष्ट्रात अडकले असून त्यांची संपूर्ण जबाबदारी राज्य सरकार घेईल असं आश्वासन उद्धव यांनी ट्विटवरुन सर्व राज्यातील प्रमुख नेत्यांना दिलं आहे.

दरम्यान राज्यातील सामान्य जनतेनेही उद्धव ठाकरे यांच्या नेतत्वाचे कौतुक केलं आहे. यासंदर्भातील अनेक पोस्ट सोशल मिडियावर पहायला मिळत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 6, 2020 1:03 pm

Web Title: coronavirus maharashtra cm uddhav thackeray praise by celebrities and leaders across the nation for handling state during this crisis scsg 91
टॅग : Coronavirus
Next Stories
1 Coronavirus : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितले पाच संकल्प
2 युवराजची करोना विरोधातील लढाईत उडी; केली ५० लाखांची मदत
3 करोनाविरुद्ध दीर्घ काळ चालणाऱ्या या मोठ्या लढाईसाठी देश सज्ज : नरेंद्र मोदी
Just Now!
X